नंदुरबार - अक्कलकुवा हा राज्यातील पहिल्या क्रमांकाचा मतदारसंघ आहे. मात्र, या मतदार संघातील मणिबेली या गावातील ग्रामस्थांनी मतदानावर बहिष्कार घातला आहे. गावात मुलभूत सुविधा नसल्याने गावकरी संतापले. त्यामुळे गावकऱ्यांनी मतदानावर बहिष्कार टाकला आहे.
अक्कलकुवा मतदार संघातील मणिबेली गावामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून वीज, पाणी व आरोग्य, अशा मुलभूत सुविधांची वाणवा आहे. याबाबत गावकऱ्यांनी प्रशासनाला तसेच लोक प्रतिनिधींना वारंवार सूचना करुन निवेदन दिले, आंदोलनही केले. मात्र, गाव आद्याप मुलभूत सुविधांपासून वंचित आहे. त्यामुळे गावकऱ्यांनी विधानसभा मतदानावर बहिष्कार घातला आहे.
याबाबत सकाळी ९:३० वाजता प्रशासनाला शासकीय व्हाट्सअॅप ग्रुपवर माहिती कळली होती. तरीही प्रशासनातील एकाही अधिकाऱ्याने गावात जाऊन गावकऱ्यांचे प्रश्न सोडवणे किंवा त्यांना मुलभूत सुविधा पुरवण्याचे आश्वासन देण्याची तसदी घेतली नाही. त्यामुळे गावकऱ्यांनी सरळ मतदानावर बहिष्कार टाकला आहे. मणिबेली गावात ३२८ मतदार आहेत. त्यापैकी सहदेव तडवी या एकाच मतदाराने मतदानाचा हक्क बजावला आहे. मात्र, उर्वरित ३२७ मतदारांनी मतदानावर बहिष्कार घातला आहे.
हेही वाचा- मतदानासाठी जिल्हा प्रशासनाची जय्यत तयारी; 1,385 मतदान केंद्रांवर पार पडणार मतदान