नंदुरबार - विधानसभेच्या २८८ जागांसाठी आज (सोमवार) मतदान प्रक्रिया पार पडली. नंदुरबार जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघात सकाळी ७ वाजण्यापासून मतदानाला सुरुवात झाली होती. राज्यात कोल्हापूरमध्ये सर्वाधिक ७८ टक्के मतदान झाले आहे. त्यापाठोपाठ गडचिरोली आणि नंदुरबारमध्ये मतदान झाले आहे.
डॉ. विजयकुमार गावित यांनी बजावला मतदानाचा हक्क
नंदुरबार विधानसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार डॉक्टर विजयकुमार गावित यांनी सपत्नीक आपल्या मतदानाचा हक्क बजावला. डॉक्टर विजयकुमार गावित यांनी आपल्या मूळ गावी नटावद येथे मतदानाचा हक्क बजावला. मतदानाला जाण्यापूर्वी त्यांनी आईचा आशीर्वाद त्यांनी मतदान केले मतदारांनी मतदानासाठी बाहेर निघावे अस आहवान त्यांनी केले.
भाजप उमेदवार भरत गावित यांनी नागपूर विधानसभा क्षेत्रात केले मतदान
नवापूर विधानसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार भरत माणिकराव गावित यांनी आपल्या मूळ गावी धुडी पाडा याठिकाणी मतदानाचा हक्क बजावला. भरत गावित यांनी सहपरिवार मतदानाचा हक्क बजावला. यावेळी मतदारांनी मतदानासाठी बाहेर येऊन मोठ्या प्रमाणात मतदान करावे, असे आवाहन त्यांनी केले.
काँग्रेसचे उमेदवार पद्माकर वळवी यांनी केले मतदान
नंदुरबार शहादा तळोदा विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार पद्माकर वळवी यांनी मतदानाचा हक्क बजावला. काँग्रेसचे उमेदवार पद्माकर वळवी यांनी आपल्या मूळ गावी तळोदा तालुक्यातील मोदलपाडा येथे सहपरिवार आपला मतदानाचा हक्क बजावला लोकशाहीच्या उत्सवात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन मतदान करण्याचे आवाहन वळवी यांनी यावेळी केले.
विकलांग मतदारांसाठी निवडणूक आयोगाकडून विशेष व्यवस्था
जिल्ह्यातील सर्व विधानसभा क्षेत्रात विकलांग मतदाराला मतदान केंद्रापर्यंत घेऊन जाण्यासाठी व्हीलचेअर आणि स्वयंसेवकांची मदत उपलब्ध करून देण्यात आली होती. प्रत्येक मतदान केंद्रावर स्काऊटचे विद्यार्थी आणि राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी यांना विकलांग मदतनीस म्हणून नेमण्यात आले. त्यामुळे विकलांग मतदारांना आपला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सोयीचे झाले होते.
जिल्हाधिकारी राजेंद्र भारूड यांनी सपत्नीक केले मतदान
नंदुरबार जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉक्टर राजेंद्र भारूड यांनी सपत्नीक नंदुरबार नगर परिषदेच्या शाळा क्रमांक 11 मध्ये आपला मतदानाचा हक्क बजावला. जिल्हाधिकारी मतदानासाठी आले असताना याठिकाणी मतदानासाठी मतदारांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या जिल्हाधिकाऱयांनी रांगेत उभे राहून मतदानाचा हक्क बजावला. त्यांनी नागरिकांना मतदानासाठी बाहेर पडण्याचे अहवान केले.