नंदुरबार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा गुरुवारी नंदुरबारमध्ये आली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी जनतेला संबोधीत केले. यात्रेची सुरुवात नंदुरबारमधून करण्याचे उद्दिष्ट म्हणजे नंदुरबार जनतेने दिलेलं प्रेम व त्यांचा उत्साह होय. नंदुरबार हा काँग्रेसचा बालेकिल्ला होता. परंतु या जिल्ह्याचा विकासाचा नंबर सगळ्यात शेवटून असायचा. त्यामुळेच नंदुरबार जनतेने विकास करणारे सरकार निवडले आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.
महाजनादेश यात्रेत मुख्यमंत्र्यांच्या हस्ते काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांनी भाजपात प्रवेश केला. यात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माणिकराव गावित यांचे पुत्र भरत गावित, काँग्रेसचे कार्याध्यक्ष तथा सातपुडा साखर कारखान्याचे चेअरमन दीपक पाटील, धडगावचे राष्ट्रवादीचे नेते विजय पराडके, किरसिंग वसावे, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष रामभाऊ पाटील यांचा समावेश आहे.
काँग्रेस-राष्ट्रवादीचे सर्वच नेते भाजपामध्ये येत असल्याने लढायचे कोणाशी, असा प्रश्न मुख्यमंत्र्यांनी यावेळी उपस्थित केला. विरोधकांनो आमच्या मेगा भरतीची नव्हे तर तुमच्या मेघा गळतीची चिंता करा, असा टोला मुख्यमंत्र्यांनी शरद पवार आणि अशोक चव्हाण यांना लगावला आहे.
आमचे विरोधक फक्त आमचा मुद्दा घेऊन बसले आहेत. त्यांची सत्तेची मुजोरी गेली नाही म्हणून जनतेने त्यांना नाकारलं आहे. संपूर्ण महाराष्ट्र पूर्ण ताकतीने मोदींच्या पाठीशी उभा आहे. नंदुरबारची जनता तुम्ही तयार आहात का? तुमची साथ मागायला आलो आहे, असं सांगत मुख्यमंत्र्यांनी जनतेचा आशीर्वाद घेतला.