नंदुरबार- जिल्ह्यात कोरोनाचा रुग्ण आढळून आला आहे. यानंतर पालकमंत्री तथा राज्याचे आदिवासी विकासमंत्री के. सी. पाडवी यांनी जिल्हा प्रशासनाकडून जिल्ह्यातील परिस्थितीचा आढवा घेतला. त्यांनी नागरिकांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे.
पालकमंत्री के. सी. पाडवी यांनी जिल्हा प्रशासनाकडून परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर जनतेशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, की संचारबंदीच्या काळात पोलिसांचे आदेश मोडणाऱ्याची आणि आरोग्य कर्मचारी तसेच आशा वर्कर यांच्यासोबत हुज्जत घालणाऱ्यांची मस्ती जिरवली जाईल. तर प्रशासन आणि राज्य सरकार सर्व सुविधा उपलब्ध करून देत आहे. त्यामुळे, जिल्हा पुन्हा ग्रीन झोनमध्ये येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.