नंदुरबार - सातपुड्याच्या कुशीतील धडगाव तालुक्यात आढळून आलेला एक कोरोनाबाधीत रुग्ण संसर्गमुक्त झाला आहे. परंतु नंदुरबार जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता धडगाव येथे तीन दिवसांचा जनता कर्फ्यू लागू करण्यात आल आहे. त्यामुळे सर्वच व्यवहार बंद ठेवून कडकडीत लॉकडाऊन पाळण्यात आला. धडगाव शहरातील प्रमुख चौकांसह रस्त्यांवर दिवसभर शुकशुकाट पसरला होता. यावेळी नगरपंचायतीच्या पथकाने शहरात फिरुन जनता कर्फ्यू लागू असल्याचे सांगत नागरिकांना घरातच राहण्याचे आवाहन केले. तसेच पोलीसांनी ठिकठिकाणी बंदोबस्त ठेवला.
नंदुरबार जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोनाचे नवे रुग्ण आढळून येत आहेत. जिल्ह्यातील चार शहरांमध्ये आठ दिवसांचा लॉकडाऊन करण्यात आल्याने या संचारबंदीतून अक्कलकुवा व धडगाव हे दोन तालुके वगळण्यात आले. परंतु स्थानिक प्रशासनाने खबरदारी म्हणून धडगाव येथील बाजारपेठ बंद ठेवण्याचा निर्णय घेऊन 26 जुलै ते 28 जुलै असे तीन दिवस जनता कर्फ्यू लागू करण्याचा निर्णय घेतला. धडगाव शहरात जनता कर्फ्यूच्या अंमलबजावणीला सुरुवात झाली. सर्वच व्यापार्यांसह दुकानदारांनी सकाळपासून दुकाने न उघडता व्यवहार बंद ठेवला.
धडगाव नगरपंचाय कर्मचार्यांच्या पथकाने शहरात फिरून जनता कर्फ्यूचे पालन करण्याचे आवाहन केले. धडगाव येथील उमराणी चौफुली, भगवा चौक, बाबा चौक, होळी चौक, स्टेट बँक परिसर अशा विविध भागांमध्ये दिवसभर शुकशुकाट होता. पोलिसांनीही शहरांच्या हद्दींसह ठिकठिकाणी बंदोबस्त ठेवला. विनाकारण फिरताना आढळून आलेल्यांना समज देऊन पोलिसांनी घरी पाठवले. तसेच बहुतांश नागरिकांनी स्वतः घरी थांबून लॉकडॉऊनचे पालन करीत जनता कर्फ्यूला प्रतिसाद दिला. दरम्यान, धडगाव (अक्राणी) हे तालुक्याचे ठिकाण असल्याने सातपुड्याच्या दर्याखोर्यातील नागरिक विविध कामानिमित्त धडगाव येथे येतात. जनता कर्फ्यूबाबत काहींना माहिती नसल्याने ते कामानिमित्त आले. परंतु शहर लॉकडाऊन असल्याचे कळताच दर्याखोर्यातून आलेल्या नागरिकांना आपल्या गावाकडे परतावे लागले.