नंदुरबार - राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन हे आपल्या पक्षाला मजबूत करत असताना दुसरीकडे मात्र त्यांच्याकडे असलेल्या जलसंपदा विभागाकडे त्यांचे लक्ष नसल्याचे दिसून येत आहे. धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यातील जलसंपदा विभागाच्या अनेक कार्यालयांची दुरावस्था झालेली आहे. मात्र, त्याकडे लक्ष देण्यात आलेले नाही.
नंदुरबार जिल्ह्यातील शहादा येथील पाटबंधारे उपविभाग, प्रकाशा या कार्यालयाला अक्षरश: गळती लागली आहे. या गळतीमुळे कार्यालयात सर्वत्र पाण्याचे साम्राज्य झाले आहे. अशा पाण्यातूनच वाट काढत कर्मचारी आपले काम करीत आहेत. छतावरून पाणी टपकत आहे. तर उरलेल्या जागेमध्ये कर्मचारी आपला टेबल टाकून काम करत असतानाचे हे चित्र जलसंपदा विभागाच्या दुरावस्थेची साक्ष देत आहे.
विशेष म्हणजे हे कार्यालय जलसंपदा विभागाच्या उपविभागीय अधिकार्यांचे आहे. तरीही याठिकाणी पाण्याची गळती थांबविण्यात जलसिंचन विभागाला यश आलेले नाही. तर जिल्ह्यात असलेल्या धरणाची आणि लघु सिंचन प्रकल्पांची गळती हे कसे थांबवतील? असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.