नंदुरबार- जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. कोरोनामुळे 34 जणांचा मृत्यू झाला आहे. गेल्या आठ दिवसात 12 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील वाढता मृत्युदर चिंतेचे कारण ठरत आहे.
जिल्ह्यात वाढत्या कोरोना मृत्यूच्या कारणांचा आढावा घेण्याचा प्रयत्न असता यात सर्वाधिक मृत्यू रुग्ण दाखल झाल्यानंतर 48 तासाच्या आत झाल्याचे समोर आले आहे. मुख्य कारण म्हणजे रुग्णांनी लक्षणे आढळून आल्यानंतर ही त्याकडे दुर्लक्ष केल्याने यातील 90 टक्के रुग्ण अत्यवस्थ स्थितीत रूग्णालयात दाखल झाले आहेत. नागरिकांनी कोणत्या ही प्रकारची भीती न बाळगता तपासणी करुन घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी राजेंद्र भारुड यांनी केले आहे.
जिल्ह्यातील सर्वात जास्त रुग्ण नंदुरबार शहरात आहेत. शहरात आता पर्यंत 447 रुग्ण आहेत तर 34 जणाचा मृत्यू झाला आहे. या बाबी लक्षात घेता नंदुरबार मधील कोरोना वर मात करण्यासाठी दोन मोबाईल स्वॅब कलेशन लॅब सुरू करण्यात आल्या आहेत. त्या शहरातील विविध भागात जाऊन लक्षणे असणाऱ्या नागरिकांचे नमुने तपासणीसाठी घेणार आहेत,अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारुड यांनी दिली आहे.
जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या आणि मृत्यूदर कमी करण्यासाठी प्रशासनाला नागरिकांनीही साथ देण्याची गरज आहे. आपण आपली काळजी घ्या आणि सुरक्षित राहा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.