नंदुरबार - गुजरात व महाराष्ट्राच्या सीमावर्ती भागामध्ये गेल्या दोन महिन्यात मोठ्या प्रमाणावर अवैद्य दारू साठा पोलिसांनी जप्त केला आहे. नवापूर शहरातील नाल्यात पलटी झालेल्या ट्रकमधून पोलिसांनी दारूचा 52 लाख 60 हजार 800 रुपये किंमतीचा मद्यसाठा आणि 10 लाख रुपये किंमतीचा ट्रक, असा एकुण 62 लाख 60 हजार 800 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
1 जुन 2020 ला सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास पोलीस उपनिरीक्षक नासीर पठाण हे गावात गस्त करीत असतांना नयी होन्डा भागाकडे ट्रक (क्रमांक GJ 18 X 9790) दिसुन आला. यावेळी चालकाने नासीर यांना पाहून सरळ सुरत रोडने न जाता शहरात गाडी वळविली. त्यामुळे उपनिरीक्षक नासीर पठाण यांना त्या वाहनाचा संशय आला आणि त्यांनी वाहनाला थांबण्याचा इशारा केला.
मात्र, ट्रक न थांबवता चालक शहराच्या दिशेने निघुन आला. यावर पोलीस निरीक्षक विजयसिंग राजपुत यांना ही माहिती मिळताच, त्यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक दिगंबर शिंपी, धिरज महाजन व सोबतच्या पोलीस कर्मचाऱ्यांना गुजरात राज्याकडे जाणाऱ्या नारायणपूर रोडवर त्या ट्रकचा शोध घेण्यासाठी रवाने केले.
ट्रक चालकाने पोलीसांना समोरुन येताना पाहताच ट्रक दुसऱ्या मार्गाने नेण्याचा प्रयत्न केला. त्याच वेळी ट्रक नाल्यात पलटी झाला व चालक तिथून पसार झाला. पोलीसांनी ट्रकची तपासणी केली असता, त्यात 52 लाख 60 हजार 800 रुपये किंमतीचा मद्यसाठा आढळुन आला. या प्रकरणी गुन्हाही दाखल करण्यात आला आहे.
पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक धिरज महाजन करीत आहेत. ही कारवाई पोलीस अधिक्षक महेंद्र पंडीत, अप्पर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी, उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विजयसिंग राजपुत, सहाय्यक पोलीस निरीक्षक धिरज महाजन, दिगंबर शिंपी, पोलीस उप निरीक्षक नासीर पठाण आदी कर्मचाऱ्यांनी केली.