नंदुरबार - केंद्र सरकारचा कृषी अध्यादेशाची राज्यात अंमलबजावणी करणारे परिपत्रकाला राज्य सरकारने पुढील आदेशापर्यंत तात्पुरती स्थगिती दिली आहे. या स्थगितीच्या विरोधात जिल्ह्याभरात आंदोलन करण्यात येऊन स्थगिती आदेशाची होळी करण्यात आली. यावेळी भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.
माथाडी कामगार तसेच राष्ट्रवादीचे नेते शशिकांत शिंदे यांच्या अपिलावर सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांनी केंद्र सरकारच्या कृषी अध्यादेशाला स्थगिती देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाच्या विरोधात भाजपने राज्यभर आंदोलन पुकारले आहे. जिल्ह्याभरात कृषी उत्पन्न बाजार समितीचा आवारात भाजपकडून निषेध आंदोलन करण्यात आले. जिल्हाध्यक्ष विजय चौधरी यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आदेशाची होळी करीत घोषणाबाजी केला. तळोदा येथे आमदार राजेश पाडवी यांच्या नेतृत्वाखाली अध्यादेशाची होळी करण्यात आली. त्याचप्रमाणे शहादा, अक्कलकुवा व नवापूर येथेदेखील आंदोलन करण्यात आले. यावेळी जिल्हा संघटक निलेश माळी, प्रदेश कार्यकारणी सदस्य राजेंद्रकुमार गावित, किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष बुधा पटेल, शहराध्यक्ष नरेंद्र माळी आदी उपस्थित होते.