नंदुरबार - जागतिक एड्स दिवसानिमित्त जिल्ह्यातील शहादा येथे एक आगळा वेगळा विवाह सोहळा संपन्न झाला. या सोहळ्याचे आयोजन पोलिसांनी केल्याने हा सामूहिक विवाह सोहळा अनेक अर्थांनी चर्चेत राहिला. काय आहे या सामूहिक विवाह सोहळ्याचे वैशिष्ट्य पाहूया याचाच एक खास रिपोर्ट...
आकर्षक रोशनाई, सनई, चौघडे यांचा मंगल सूर त्याचसोबत बँडच्या तालावर नाचणारे वऱ्हाडी मंडळी. सजवलेल्या बग्गीत बसलेले वधु-वर. हे सारे दृश्य पाहिल्यावर आपल्याला एखाद्या मोठ्या विवाह सोहळ्याची कल्पना येईल. मात्र, शहाद्यात झालेला हा विवाह सोहळा सर्वच अर्थाने आगळावेगळा होता. हा सोहळा होता तो एड्सग्रस्त पाच जोडप्यांचा सामूहिक विवाह सोहळा. शहादा उपविभागीय पोलीस अधिकारी पुंडलिक सपकाळे यांनी या विवाह सोहळ्याचे आयोजन केले होते.
एड्स बाधितांकडे पाहण्याचा समाजाचा एक वेगळा दृष्टिकोन आहे. या साऱ्या गोष्टींना छेद देत शहादा उपविभागीय पोलीस अधिकारी पुंडलिक सपकाळे हे २००८ पासून या सोहळ्याचे आयोजन करीत असल्याची माहिती त्यांनी दिली. एड्सग्रस्त जोडप्यांसाठी उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांनी सुरु केलेला हा सामूहिक विवाह सोहळ्याचा उपक्रम एड्सग्रस्तांना जीवन जगण्याची नवीन उमेद देणारा ठरला आहे. तर, यातूनच पोलिसांमधील मानवी दृष्टिकोन समोर आला आहे.
शहादा उपविभागीय कार्यालयाच्या आवारात या सोहळ्याचे आयोजन केले गेले. उपविभागीय प्रांताधिकारी डॉ.चेतन गिरासे, तहसीलदार मिलिंद कुलकर्णी यांच्या साक्षीने एचआयव्हीग्रस्त समविचारी जोडप्यांचा विवाह सोहळा पार पडला. यावेळी, गावात वाजतगाजत नवरदेवाची मिरवणूक काढण्यात आली. नवरदेव मंडपात आल्यानंतर व्यासपीठावर उपस्थित मान्यवरांनी मुंबई दहशतवादी हल्ल्यातील शहिदांना आदरांजली वाहिली.