नंदुरबार - यंदाच्या पावसाळ्यातील मृग नक्षत्राच्या पावसाने नंदुरबार जिल्ह्यात दमदार हजेरी लावली. यामुळे अनेकांची धावपळ उडाली तर रस्त्यावर अनेक ठिकाणी पाणी साचले होते. या पावसामुळे मंगळ बाजारात एक कार बुडाली तर अनेक दुचाकी वाहने वाहून गेल्याच्या घटनाही घडल्या. दरम्यान, या पावसामुळे शहरातील नागरिकांची उकाड्यापासून सुटका झाली आहे.
शनिवारी सकाळपासून ढगाळ वातावरण होते. सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास विजांचा कडकडाटासह पावसाला सुरुवात झाली. मुसळधार पावसामुळे अवघ्या काही मिनिटात रस्त्यावरुन पाणी वाहून लागले. जसजसा पावसाचा जोर वाढत गेला तशी पाण्याची पातळी वाढली. या पावसात मंगळ बाजारात, शहजादा नाल्याच्या ओढ्यात एक कार बुडाली. यातील कागदपत्राचे नुकसान झाले. याशिवाय इतर भागामध्ये पाण्याचा प्रवाहात दुचाकी वाहून गेल्याच्या घटनाही समोर आल्या. मंगळ बाजारातील अनेक दुकानांमध्ये पाणी शिरल्याने अनेकांचे नुकसान झाले.
विजांचा कडकडाट आणि ढगांचा गडगडाट करत चार तास हा पाऊस कोसळत होता. दरम्यान, या पावसाने बळीराजा सुखावला आहे. नंदुरबार, नवापूर यासह जिल्ह्यात अनेक ठिकाणी हा पाऊस झाला. या पावसामुळे आता खरीप हंगामाच्या पेरणीला वेग येणार आहे.
हेही वाचा - नंदुरबारमध्ये आमदार पडळकर यांच्याविरोधात राष्ट्रवादीचे तीव्र आंदोलन
हेही वाचा - नंदुरबार जिल्ह्याच्या पूर्व पट्ट्यात जोरदार पाऊस