नंदुरबार - जिल्ह्यात आणि मध्य प्रदेशच्या सीमावर्ती भागात बेमोसमी पावसाने हजेरी लावली असून अनेक भागात गारपिटीसह पाऊस झालेला आहे. शहादा तालुक्यातील धामणगाव, खेडदिगर या परिसरात अचानक पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांचे गहू केळी, पपई व मका पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अचानक आलेल्या पावसाने नागरिकांची धावपळ झाली.
शहादा तालुक्यातील सकाळपासूनच ढगाळ वातावरण व जोरदार हवा सुरू असल्यामुळे पावसाचे वातावरण निर्माण झाले होते. दुपारच्या सुमारास जोरदार वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली. यावेळी काही भागात गारपीटदेखील झाली असून शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. शहादा तालुक्यातील खेडदीगर, आंबापूर, गणोर, खेतीया (मध्यप्रदेश) राणीपूर आदी परिसरात जोरदार वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली, यामुळे शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणावर तारांबळ उडाली.
या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्याचे केळी व पपई लागवड झालेल्या क्षेत्राचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून काही शेतकऱ्यांची गहू तयार झाले होते व ते कापणीसाठी आले होते. या अवकाळी पावसात ते गहू देखील पूर्णपणे नष्ट झाली आहेत. यामुळे शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. ग्रामीण भागात कोरोनामुळे अगोदरच शेतकरी अडचणीत सापडला असून आता झालेल्या गारपीट मुळे शेतकरी अडचणीत आला आहे.