नंदुरबार- जिल्ह्यातील शहादा आणि तळोदा तालुक्यात शुक्रवारी जोरदार पावसाने हजेरी लावली. या वादळी पावसाने अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली. तर शहादा तालुक्यातील सोनवल आणि डोंगरगाव येथे घरांचे नुकसान मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यात एक पुरुष व महिला जखमी झाले आहेत.
यंदा मान्सूनचे लवकर आगमन होण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला होता. काही दिवसांपासून उकाडा जाणवत असल्याने शेतकर्यांसह नागरिकांनाही पावसाच्या आगमनाची उत्सुकता होती. मात्र, अखेर मान्सूनचे आगमन झाले असून जिल्ह्यातील शहादा व तळोदा शहरासह तालुक्यात पावसाने जोरदार हजेरी लावली. या वादळी पावसामुळे झाडे उन्मळून पडल्याने मार्केटमधील धान्यसह घरांचेही नुकसान झाले.
शहादा शहरात व्यापार्यांची धावपळ उडाली. तब्बल दीड तास वादळी वाऱ्यासह पाऊस सुरू होता. त्यामुळे परिसरातील वीज पुरवठा काही काळासाठी खंडीत झाला होता. सोनवल त.श. भागात पावसाने घरांचे नुकसान झाले. यात घरांच्या पडझडीत सोनवल येथील एक पुरुष व डोंगरगाव येथील एक महिला जखमी झाली आहे.
तळोदा शहरासह तालुक्यातही वादळी वार्यासह जोरदार पाऊस झाला. तब्बल एक तास झालेल्या या पावसाने काही ठिकाणी वृक्ष उन्मळून पडली. तळोदा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या धान्य मार्केटमध्ये पाणी शिरल्याने धान्याचे मोठे नुकसान झाले. शहरातील कॉलेज रोडवरील धान्य विक्रेता निखील भावसार यांच्या दुकानात पाणी शिरल्याने धान्याचे नुकसान झाले. बायपास रोडवरील मुक्तार बिहारी यांच्या गॅरेजच्या दुकानाची पत्रे उडाल्याने दुकान जमिनदोस्त झाले. शहरातील इस्माईल गनी पिंजारी यांच्या घराची संरक्षित भिंत कोसळली. सुदैवाने या घटनेत कुणीही जखमी झालेले नाही. सायंकाळपासून वीज पुरवठाही खंडीत होता.
तलावडीत विद्युत रोहित्र कोसळले..
तळोदा शहरात काही विद्युत पोल पडले आहेत. तलावडी येथील 132 के.व्ही.विद्युत रोहित्र पडल्याने शहरासह तालुक्याचा विद्युत पुरवठा खंडीत झाला आहे. महावितरणच्या कर्मचार्यांकडून वीज जोडणीचे काम सुरू आहे. शनिवारी सायंकाळपर्यंत वीजपुरवठा सुरळीत होण्याची शक्यता आहे.