नंदुरबार - नवापूर तालुक्यातील बोरझर, चरणमाळ, प्रतापपूर तसेच धुळे जिल्ह्यातील बोपखेल, वारसा, उमरपाटा, कुडाशी, मांजरी, शेंडवाद, नांदरखी या पिंपळनेर परिसरातील पश्चिम पट्ट्यात अवकाळी पाऊस आणि गारपीटीमुळे शेतकऱ्यांचा तोंडाशी आलेला घास हिरावला आहे. दोन दिवसांपूर्वी शहादा तालुक्यात गारपीट व अवकाळी पाऊस झाला होता.
गारपिटीमुळे परिसरात पसरली बर्फाची चादर
नवापूर तालुक्यातील पश्चिम पट्ट्यात मोठ्या प्रमाणात संध्याकाळी चार वाजेच्या सुमारास एक ते दीड तास अवकाळी व गारपीट झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. कांदा, गहू, हरभरा, भुईमूग, ज्वारी या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. गारपीट एवढी झाली की बोपखेल गाव आहे की जम्मू कश्मीर, असे वाटू लागले आहे. संपूर्ण गावात बर्फाची पांढरी चादर पसरली आहे.
पशुधनासह पिकांचे नुकसान
एकीकडे उन्हाचा कडाका असताना दुसरीकडे नंदुरबार, धुळे जिल्ह्यातील काही भागांमध्ये गारपीट झाली आहे. नवापूर व साक्री तालुक्यात अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतपिकांचे मोठे नुकसान झाल्याचे पाहायला मिळाले. धुळे जिल्ह्याच्या पश्चिम पट्ट्यात बोपखेल या भागात प्रचंड गारपीट झाल्याने काही पक्षी देखील मृत्युमुखी पडले आहेत. काही कोंबड्या दगावल्या आहेत. शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. या गारपिटीमुळे नंदुरबार, धुळे जिल्ह्यातील काही गावांतील शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. तसेच, गुजरात राज्यातील सोनगड तालुक्यातील ओटा परिसरात देखील गारपीट झाल्याने नुकसान झाले आहे. ऐन उन्हाळ्यात गारपीट झाल्याने वातावरणात थंडावा निर्माण झाला आहे.
हेही वाचा - Food Poisoning in Nandurbar : नंदुरबारमध्ये फराळातून 135 व्यक्तींना विषबाधा