नंदुरबार - अक्कलकुवा ग्रामपंचायतीत धाडसी चोरी केल्याचा प्रकार समोर आला आहे. चोरट्याने ग्रामपंचायतीचे दप्तरा चोरन्यासह तेथील सीसीटीव्ही कॅमेरेदेखील चोरुन नेले आहेत. विशेष म्हणजे अक्कलकुवा ग्रामपंचायतीच्या गैरव्यवहाराची चौकशी अंतिम टप्प्यात सुरू असतांनाच ग्रामपंचायतीचे दप्तर चोरीला गेले आहे. त्यामुळे तर्क-वितर्क लावण्यात येत आहेत. गैरव्यवहाराच्या चौकशीसाठी महत्वाचे असलेले दप्तरच चोरीला गेल्यामुळे चर्चेला उधाण आले आहे.
चौकशीवर परिणामाची शक्यता-
अक्कलकुवा ग्रामपंचायतीत चोरी झाली आहे. विशेष म्हणजे ग्रामपंचायत कार्यालयातून ग्रामपंचायतीच्या दप्तरासह नुकतेच लावण्यात आलेले सीसीटीव्ही कॅमेरे सुध्दा चोरट्यांनी लंपास केले आहेत. त्यामुळे ही चोरी नैसर्गिक आहे की नियोजनबध्द? हा संशोधनाचा विषय ठरला आहे. गैरव्यवहारामुळे अक्कलकुवा ग्रामपंचायत गेल्या वर्षभरापासून चर्चेत आहे. पंचायतीतील भ्रष्टाचाराची चौकशी अंतिम टप्प्यावर आली असतांना ग्रामपंचायतीतून चोरट्यांनी दप्तर चोरीला नेल्याने पोलिसांसमोर आव्हान उभे राहिले आहे.
अक्कलकुवा ग्रामपंचायतीत झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू आहे. ग्रामपंचायतीचे दप्तर यापूर्वी विद्यमान सरपंच राजेश्वरी वळवी यांच्याकडे असल्याची तक्रार करण्यात आली होती. या तक्रारींची दखल घेत नंदुरबारचे जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिलेल्या निर्देशानुसार अक्कलकुवा पंचायत समितीचे सहाय्यक गटविकास अधिकारी यांच्या उपस्थितीत ग्रामपंचायतीचे दप्तर ग्रा.पं.कार्यालयात ठेऊन सीलबंद करण्यात आले होते. मात्र चोरट्यांनी दप्तरच लांबविल्याने चौकशीचे होणार काय? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. सायंकाळी अक्कलकुवा पोलिसांनी घटनास्थळी पाहणी केली. चोरांचा माग घेण्यासाठी श्वान पथकालाही पाचारण करण्यात आले होते.
पोलिसांपुढे आव्हान
अक्कलकुवा ग्रामपंचायतीत भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून मोठा वादंग निर्माण झाला होता. काही दिवसांपूर्वी पंचायत समिती कार्यालयात बीडीओ व सरपंच यांच्यात वाद होऊन त्याचे पर्यावसन पोलीस ठाण्यापर्यंत गेले होते, वेळीच वरिष्ठांकडून मध्यस्थी केल्यानंतर हा वाद थांबविण्यात आला होता. मात्र आता थेट ग्रामपंचायतीतील वादग्रस्त दप्तर चोरीला गेल्याने पोलिसांपुढे मोठे आव्हान निर्माण झाले आहे.