नंदुरबार - गांधीधाम-पुरी एक्सप्रेसच्या ( Gandhidham Puri Express catches fire ) दोन डब्यांना नंदुरबार रेल्वे स्थानकापासून ( Nandurbar Railway Station ) काही अंतरावर आग लागली होती. या आगीवर नियंत्रण मिळविण्यात रेल्वे प्रशासन व नंदुरबार नगरपालिकेच्या अग्निशमन दलाला यश आले आहे. सुमारे दोन तासांपेक्षा अधिक सुरू असलेल्या या आगीत कुठलीही जीवित हानी झाली नाही तर आग विझवतांना रेल्वे कर्मचारी किरकोळ जखमी झाले आहेत. सुमारे चार तासानंतर सुरत-जळगाव लोहमार्गावरील वाहतूक सुरळीत करण्यात आली.
- गांधीधाम पुरी एक्सप्रेसला अचानक आग -
गांधीधाम येथून पुरीच्या दिशेने ही ट्रेन निघाली होती. गाडी नंदुरबार रेल्वे स्टेशनपासून अवघ्या काही अंतरावर असताना एक्सप्रेसमधील पॅन्ट्रीच्या डब्यात अचानक आग लागली. हा प्रकार लक्षात येताच ट्रेन तात्काळ थांबवण्यात आली. नंतर रेल्वेतील प्रवाशी गाडीतून बाहेर पडले. घटनास्थळी नंदुरबार अग्निशमन दलाच्या चारपेक्षा अधिक बंब दाखल झाले होते. सुमारे दोन तासांपेक्षा अधिक काळ ही आग चालली. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांना व अग्निशमन दलाच्या जवानांना शर्थीचे प्रयत्न करावे लागले.
- ...आणि अनर्थ टळला -
गांधीधाम - पुरी एक्सप्रेसमधील पॅन्ट्री कार कोचला आग लागली. पाहता पाहता आगीने रौद्र रूप धारण केले. आग लागलेल्या कोचच्या दोन्ही बाजूला एसी कोच असल्यामुळे आग इतर डब्यांना लागू नये म्हणून रेल्वे कर्मचारी व अधिकाऱ्यांनी दोन्ही बाजूचे डब्बे वेगळे करून आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रयत्न केले. एक्सप्रेसमधील पॅन्ट्रीच्या डब्याला ही आग लागली. पॅन्ट्रीच्या डब्यात खानपानाचे साहित्य, सिलिंडर असल्याने आगीने मोठ्या प्रमाणात पेट घेतला असता. म्हणून रेल्वे प्रशासनाने डब्यातील सिलेंडर व इतर साहित्य बाहेर फेकले त्यामुळे अनर्थ टळला.
- जळगाव ते सुरत दरम्यानच्या रेल्वे मार्गातील विद्युतपुरवठा बंद -
गांधीधाम एक्सप्रेस आग लागल्यानंतर तात्काळ रेल्वे प्रशासनाच्यावतीने खबरदारीचा उपाय म्हणून जळगाव - सुरत रेल्वेमार्गावरील विद्युत पुरवठा जवळपास दोन तास बंद करण्यात आला होता. त्यामुळे अनेक गाड्या अडकुन पडल्याने प्रवाश्यांचा खोळंबा झाल्याचे चित्र देखील पहावयास मिळाले. या घटनेत सुदैवाने कुठलीही जीवितहानी झालेली नाही. मात्र खांडबारा रेल्वे स्टेशन सोडल्यानंतरच या कोचला आग लागल्याचा अंदाज व्यक्त केल्या जात आहे. जवळपास वीस ते पंचवीस किलोमीटर या कोचमध्ये आगीचा थरार होता. दरम्यान या इतक्या मोठ्या घटनेनंतर देखील नंदुरबार रेल्वे स्थानकातील रेल्वेचे अधिकारी कर्मचारी यांनी काहीही बोलण्यास नकार दिला आहे.
- आगीचे कारण अद्याप गुलदस्त्यात -
गांधीधाम एक्सप्रेसच्या पॅन्ट्रीकारमधील डब्याला आग लागल्यानंतर आगीचे कारण रेल्वे अधिकारी यांना विचारले असता त्यांनी याबाबत कुठलीही माहिती देण्यास नकार दिला, मात्र शॉटसर्कीटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. तरी नंदुरबार रेल्वे स्थानकातील रेल्वे पोलीस आणि स्टेशन कर्मचाऱ्यांना आग विझवण्यात दिड तास लागल्याने त्यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह देखील निर्माण झाले आहे.
- घटनास्थळी प्रांताधिकाऱ्यांसह पोलीस अधिकारी व कर्मचारी दाखल -
नंदुरबार रेल्वेस्थानकावर गांधीधाम एक्सप्रेसला आग लागल्यानंतर नंदुरबार प्रांत अधिकारी मीनल करनवाल, नंदुरबार शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किरणकुमार खेडकर, उपनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नरेंद्र भदाणे यांच्यासह पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल होते. घटनास्थळी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांतर्फे चोख बंदोबस्त लावण्यात आला होता.
हेही वाचा - Puri Express Catch Fire : गांधीधाम पुरी एक्सप्रेसला नंदुरबार स्थानकाजवळ भीषण आग