नंदुरबार - जिल्ह्यात आणखी ४ जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. यामध्ये शहरातील तिघा जणांचा समावेश आहे. लोणखेडा (ता. शहादा) येथील ६७ वर्षीय वृद्धाचा रविवारी मृत्यू झाला होता, त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. जिल्ह्यात एकूण 68 कोरोनाबाधित असून, आतापर्यंत 32 जण बरे झाले आहेत. तर 4 जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या जिल्ह्यात 30 जणांवर उपचार सुरू आहेत.
प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार नंदुरबार शहरातील योगेश्वर नगरात ३५, राजीव गांधी नगरात २९ वर्षीय पुरुष तर बागवान गल्लीतील ७० वर्षीय वृद्धाला कोरोनाची लागण झाली आहे. तळोदा शहरातील मोठा माळीवाड्यातील ४०, मोलगी (ता. अक्कलकुवा) येथील १८ वर्षीय पुरुषाला कोरोनाचा संसर्ग झाला आहे. दरम्यान सलग चौथ्या दिवशी कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. तळोदा शहरात प्रथमच कोरोनाचा शिरकाव झाला असून ठाणे येथून परतलेल्या वृद्धेचा शनिवारी मृत्यू झाला होता.
कोरोना संसर्ग झालेला ४० वर्षीय पुरुष संबधित महिलेच्या नातेवाईक असल्याची माहिती आहे. दरम्यान, सातपुड्याच्या दुर्गम भागात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळून आला आहे. मोलगी येथे या रुग्णाच्या संपर्कात आलेल्या सात जणांना आधीच क्वारंटाईन करण्यात आले आहे. कोरोनाबाधित म्हणून आढळलेल्या सर्व रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध सुरू झाला असून त्यांना क्वारंटाईन करण्यात येत असल्याची माहिती देण्यात आली आहे.
बाधितांना आयसोलेश वॉर्डात हलवण्यात अले आहेत. उत्तर महाराष्ट्रामध्ये सर्वात कमी कोरोना रुग्णाची संख्या असलेला जिल्हा नंदुरबार होता. मात्र, आता झपाट्याने वाढत असलेली कोरोना रुग्णाची संख्या चिंतेचा विषय आहे.