नंदुरबार - शहादा येथील प्रभाग क्रमांक चारमधील एका कॉलनीतील 62 वर्षाच्या इसमाचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आल्याने खळबळ उडाली आहे. यामुळे शहादा शहर कोरोनामुक्त असल्याचा आनंद केवळ दहा दिवसाचाच ठरला. बाधित रुग्णाच्या कुटुंबातील सदस्य व परिसरातील एकूण 16 जणांना क्वारंटाईन करण्यात आले असून त्यांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. प्रशासनाने खबरदारी घेत बाधिताच्या वास्तव्यासह संपूर्ण गरीब नवाज कॉलनीत बॅरिकेटींग करुन सील करण्यात आल्याची माहिती प्रांताधिकारी डॉ. चेतन गिरासे यांनी दिली.
कोरोना विषाणूबाधित रुग्ण सापडल्यानंतर प्रशासनाने 21 एप्रिल ते 27 मे दरम्यान सुमारे 215 जणांचे नमुने जिल्हा रुग्णालयात तपासणीसाठी पाठविले होते. यात रुग्ण 9 बाधित आढळून आले. 206 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला होता. 9 पैकी एका बाधिताचा मृत्यू झाला असून आठ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. यामुळे शहादा शहर कोरोनामुक्त होते. परंतु शहर कोरोनामुक्तीचा आनंद हा केवळ दहा दिवस राहिला. परवा रात्री शहरातील एका परिसरातील एका 62 वर्षीय व्यक्तीचा अहवाल पॉझिटीव्ह प्राप्त झाला आहे.
हा रूग्ण यापूर्वीच्या कंटेनमेंट झोनमधील आहे. कोरोनाबाधित असलेल्या रुग्णावर शहरातील एका खासगी रुग्णालयात यापूर्वी उपचार करण्यात आले होते. सदर रुग्णालय प्रशासनाने सील केले असून येथील कर्मचाऱ्यांनाही क्वारंटाईन केले आहे. बाधित रूग्णावर नंदुरबार जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असून त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. सदर व्यक्तीचा कोरोनाबाधित अहवाल आल्यानंतर प्रशासन सतर्क झाले आहे. संपूर्ण परिसराला सील करण्यात आला आहे.
पालिकेच्या आरोग्य विभागामार्फत निर्जंतुकीकरण करण्यात येत असून या भागाला कंटेन्मेंट म्हणून घोषित करण्यात आले आहे. याठिकाणी अत्यावश्यक सेवा वगळता सर्व प्रतिष्ठाने बंद ठेवण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत. तरी जिल्हा प्रशासनाच्या वतीने नागरिकांना घरीच थांबावे असे आवाहन करण्यात आले आहे.