नंदुरबार - दिल्ली येथील शेतकरी आंदोलनाला सात महिने पूर्ण होत आहेत. या पार्श्वभूमीवर नवापूर तहसील कार्यालयासमोर सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी शेतकरी संघटनेच्या वतीने केंद्र सरकारच्या विरोधात निदर्शने करण्यात आली. यावेळी केंद्र सरकारच्या विरुद्ध जोरदार घोषणाबाजी करत शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव कायदा लागू करण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली.
काळे कायदे रद्द झाल्याशिवाय शेतकरी शांत बसणार नाहीत -
शेतकरी आंदोलनाला गेल्या सात महिन्यात मोदी सरकारने दडपण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु शेतकरी मागे हटलेला नाही, कारण गेल्या दोन वर्षात कोरोना लाॅकडाऊनमध्ये सर्वत्र बिकट परिस्थिती उद्भवलेली असतांनाही शेतकऱ्यांनी शेतात राबून देशाला वाचवण्याचा प्रयत्न केला आहे. कोरोनाला न भीता शेतात घाम गाळून काम करणाऱ्या शेतकऱ्याला विचारात न घेता मोदी सरकारने शेतकरी विरोधी केलेले तिन्ही काळे कायदे रद्द करावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली. जोपर्यंत काय ते रद्द होत नाही तोपर्यंत शेतकरी शांत बसणार नाहीत. असा इशारा देखील यावेळी देण्यात आला.
हमीभाव देणारा हमी कायदा लागू करण्याची मागणी -
केंद्रातील मोदी सरकारने शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव देणारा हमी कायदा तयार करावा. प्रत्येक शेतकऱ्याला आपल्या उत्पन्नातील मालाचा योग्य दर मिळेल, अशी व्यवस्था करावी. अशा मागणीचे निवेदन नवापूर तहसीलदारांना देऊन ते राष्ट्रपतींना पाठवावे अशी मागणी संघटनेच्यावतीने करण्यात आली.