नंदुरबार - शहादा तालुक्यातील सारंगखेडा येथे तापी नदीवर बॅरेज बांधण्यात आले. या बॅरेजमध्ये पाणी साठा झाल्यानंतर टेंभे गावातील नदी काठावरील 12 शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर नुकसान सहन करावे लागले आहे. त्यांच्या शेतात बॅरेजच्या पाण्याचा फुगवटा होऊन पाण्या खाली जात असते. दरवर्षी पाटबंधारे विभाग या शेतकऱ्यांना पेरणी न करण्याची नोटीस देत असते. मात्र, नुकसान भरपाई देत नाही म्हणून शेतकऱ्यांनी शेती करू द्या, नाही तर नुकसान भरपाई द्या, ती देण्यास पाटबंधारे विभाग सक्षम नसेल तर मरणाची परवानगी द्या, अशी मागणी केली.
सारंगखेडा बॅरेजच्या बुडीत क्षेत्रात येणाऱ्या या शेतकऱ्यांनी आपल्याला न्याय मिळावा म्हणून गेल्या 12 वर्षापासून सरकार दरबारी अर्ज केले आहेत. या पैकी 4 शेतकरी आपल्याला न्याय मिळेल या अपेक्षेने मृत झाले आहेत. मात्र, त्यांना न्याय मिळाला नाही. आता त्यांच्या विधवा पत्नींनी संघर्ष सुरू केला आहे. तर पाटबंधारे विभाग याकडे दुर्लक्ष करत आहे. आपल्याला न्याय कधी मिळेल, असा प्रश्न ते आता उपस्थित करू लागले आहेत.
गेल्या बारा वर्षात वरिष्ठ अधिकाऱ्यांपासून ते थेट मुख्यमंत्र्यापर्यत अनेकांजवळ न्याय मागितला. मात्र, आम्हाला पेरणीला परवानगी मिळत नाही आणि नुकसान भरपाई सुद्धा नाही. त्यामुळे आम्हाला सामूहिक आत्महत्येची परवानगी द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
या संदर्भात पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत संपर्क केला असता त्यांनी बोलण्यास नकार दिला. सरकारी लाल फितीचा कारभार या शेतकऱ्यांचा बळी घेईल कि काय अशी शंका व्यक्त केली जात आहे.