नंदुरबार - यावर्षी खरीप हंगामात पीककर्ज वाटपाची तयारी प्रशासनाने केली आहे. मात्र, त्या दृष्टीने कामकाज होत नाही. कर्ज वाटपाच्या कामाला गती नसल्याने शेतकऱ्यांना भांडवलाचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यातच लॉकडाऊनमुळे महात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजनेची यादी बँकांपर्यंत पोहोचली नसल्याने शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.
राज्य सरकारने सर्व शेतकऱ्यांना पीककर्ज उपलब्ध करून देण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, राष्ट्रीयकृत बँकांच्या कर्जवाटप कामात गती नाही. मागील कर्जाचा परतावा, सातबाऱ्यावरील बोजा, पीक पेरा, खात्यांचे आधार लिंक यातच शेतकरी बेजार होत आहे.
मागील वर्षी जिल्ह्यातील ७० टक्के शेतकऱ्यांना पीककर्ज मिळत होते. मात्र, यावर्षी जिल्ह्यात आतापर्यंत प्रत्यक्षात ३० टक्केच शेतकऱ्यांना कर्ज मिळाले आहे. खरीप हंगाम उद्यावर येऊन ठेपला आहे. मात्र, शेतकऱ्यांकडे भांडवल नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना सावकाराकडे कर्ज मागण्याची वेळ आली आहे. सरकार आणि जिल्हा प्रशासनाने कागदी घोडे नाचविण्यापेक्षा शेतकऱ्यांची समस्या सोडवावी, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे घनश्याम चौधरी यांनी केली आहे.