नंदुरबार - तालुक्यातील बाणेर परिसरातील संतप्त शेतकऱ्यांनी नंदुरबार येथील वीज वितरण कार्यालयावर आंदोलन केले. गेल्या एक महिन्यापासून विद्युत रोहित्री बंद अवस्थेत आहे. ती दुरुस्त करण्यासाठी शेतकऱ्यांनी वीज वितरण कार्यालयाच्या चकरा मारल्या परंतु विद्युत रोहित्र दुरुस्त करण्यात आली नाही. त्यामुळे अखेर शेतकऱ्यांनी वितरण कार्यालयावर धडक आंदोलन केले. यावेळी नंदुरबार शहर पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी मध्यस्थी करत शेतकऱ्यांची समजूत काढली.
ट्रांसफार्मर जळाल्यामुळे शेतकरी संतप्त
नंदुरबार तालुक्यातील भालेर गावात गेल्या एक महिन्यापासून ट्रांसफार्मर जळाल्याने वीजपुरवठा खंडित आहे. महावितरण विभागाकडे वारंवार मागणी करून देखील नवीन ट्रान्सफॉर्मर बसवण्यासाठी महावितरण विभाग शेतकऱ्यांना वेठीस धरत आहे. आधी बिल भरा मग ट्रांसफार्मर देऊ, असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. लाॅकडाऊनमुळे शेतकऱ्यांची परिस्थिती हलाखीची झाली आहे. आम्ही संपूर्ण बिल भरू शकत नाही 50% बिल आम्ही भरलं आहे. त्वरित ट्रांसफार्मर बसवावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली. परंतु महावितरण विभागाच्या अधिकाऱ्यांकडून शेतकऱ्यांना सहकार्य न मिळाल्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी महावितरण कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. या आंदोलनादरम्यान शेतकरी संतप्त झाल्याने पोलिसांना पाचारण करावे लागले. संपूर्ण बिल भरणा करण्यास शेतकरी समर्थ नाही. त्यामुळे आम्हाला सवलत देऊन त्वरित ट्रान्सफॉर्मर बसवून वीजपुरवठा करावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.
पोलिसांनी केली मध्यस्थी
शेतकऱ्यांनी वीज वितरण कार्यालयावर आंदोलन करीत असताना पोलीस दाखल झाले. संतप्त शेतकऱ्यांनी वीज वितरण कार्यालयात घुसून अधिकाऱ्यांशी हुज्जत घालत असताना सहाय्यक पोलीस अधीक्षक किती सोनवणे व प्रवीण पाटील यांनी महावितरणचे अधिकारी व संतप्त शेतकऱ्यामध्ये मध्यस्थी केली.