नंदुरबार - जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील मंदाणा गावातील सैंदाणे परिवारासोबत बनावट लग्न लावून आठ दिवसाच्या आतच पैसे व दागिने घेऊन पोबारा करणाऱ्या टोळीतील वधू सह इतर चौघांना पोलिसांनी अटक केली. शहादा पोलिसांनी सापळा रचून बेटावद येथून त्यांना गजाआड केले आहे.
काय आहे प्रकार?
शहादा तालुक्यातील मंदाणे येथील भुषण संतोष सैंदाणे या युवकास लग्नासाठी औरंगाबादच्या बाबाराव देवराव आंबले याने 5 मेला एक मुलगी दाखविली. यानंतर भुषणने पूजा राजु शिंदे या मुलीशी विवाह करण्याचे ठरविले. हा विवाह करण्यासाठी भुषणच्या परिवाराने मुलीच्या नातलगांना 1 लाख 30 हजार रुपयांची रक्कम दिल्यानंतर त्याचा पूजाशी विवाह लावण्यात आला. लग्नानंतर काही दिवसातच 15 मेला पहाटे कोणास काही न सांगता पूजा घरातुन निघुन गेली. पत्नी दिसत नसल्याने भुषणने शोधाशोध केली. मात्र, ती मिळुन आली नसता अखेर भुषणने शहादा पोलीस ठाणे गाठत पत्नी हरविल्याची तक्रार दाखल केली. तसेच त्याने पत्नीच्या आई-वडिलांसह भाऊ व आपल्या नातलगांनाही पत्नी पूजा ही हरविल्याची माहिती कळविली.
यानंतर भूषणला एका नातलगाकडुन तुझ्या पत्नीसारखी दिसणारी मुलगी शिंदखेडा तालुक्यातील बेटावद येथे एका मंदिरात लग्न करीत असल्याचे कळाले. त्या नातलगाने मंदिरात लग्न होणार्या युवतीचा फोटो भुषणला पाठविला असता ती पूजाच असल्याची खात्री झाली. भुषणने लगेचच असलोद पोलीस दूरक्षेत्राचे हवालदार दीपक परदेशी व शिपाई साळुंखे यांना माहिती देऊन पथकासह बेटावद गाठले. मात्र, त्यांना तेथे कोणीही आढळुन आले नाही. भुषणसह पोलिसांनी परिसरात विचारपूस केली असता काही वेळेपूर्वी झालेल्या लग्न सोहळ्यातील मंडळी पळावद गावी जेवण करीत असल्याचे कळाले. पोलिसांनी त्याठिकाणी जाऊन पाच जणांना रंगेहाथ पकडले.
हेही वाचा - लग्नाच्या वाढदिवसाला पत्नीला दिला शंभर तोळे सोन्याचा हार.., त्यानंतर पतीची 'अशी' झाली धावपळ..
चौकशीदरम्यान प्रकार उघड -
चौकशी केली असता भुषणची पत्नी पूजा हिच्या नातेवाईकांनी सुरत येथील माणिक पाटील या युवकाकडुन 50 हजार रुपये घेतले आहेत. तसेच पूजाचे त्याच्याशी बेटावदला लग्न लावुन दिल्याचे समजले. लग्न झाल्यानंतर पुन्हा दिड लाख रुपये घेणार असल्याची माहितीही माणिक पाटील यांनी दिली. यानंतर नावे बदलुन युवकांकडुन पैसे घेत काही दिवसांसाठी लग्न करुन संसार थाटणार्या लटारू टोळीचा शहादा पोलिसांनी पर्दाफाश करुन पाच जणांना ताब्यात घेतले. याबाबत भुषण संतोष सैंदाणे यांनी शहादा पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्याने फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी पोलिसांनी पूजा राजु शिंदे, तिची आई वंदना राजु शिंदे, रविंद्र गैभु गोपाळ (रा.कुंभारी ता.जामनेर), योगेश संजय साठे (रा.अकोला), प्रिती राजेश कांबळे (रा.हिंगोली) या पाच जणांना अटक केली. तर लग्नासाठी मुली दाखविणारा बाबाराव देवराव आंबले, पूजाचा भाऊ भैरव राजु शिंदे, पूजा प्रकाश साळवे (रा.हिंगोली) हे तिघे फरार आहेत. तर पोलिसांच्या तपासात पूजा शिंदे हिने आतापर्यंत 13 मुलांना फसविल्याचे समजत आहे.
पोलिसांचे आवाहन -
लग्न करण्याच्या बहाण्याने या टोळीने काही वर्षांत धुळे, नंदुरबार व जळगांव जिल्ह्यात अनेकांना फसविले आहे. पैसे घेऊन लग्न करायचे आणि त्यानंतर नवरीने पळुन जायचे, असा उद्योग या टोळीचा आहे. मंदाण्यातील युवकाने तक्रार दिल्यानंतर तपासाची चक्रे फिरविली असता लग्न करुन फसवणुक करणार्या टोळीचा पर्दाफाश करण्यात यश आले आहे. खान्देशातील ज्या युवकांची लग्नाच्या बहाण्यातुन फसवणुक झाली असल्यास त्यांनी शहादा पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
हेही वाचा - पुण्यातील पहिले बाल कोविड सेंटर येरवडा येथे सुरू