नंदुरबार - कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कोविड- 19 प्रतिबंधक लसीकरण आवश्यक आहे. नंदुरबार जिल्ह्यात 100 टक्के लसीकरण होण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याशी आज व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधत विविध सूचना केल्या आहेत. त्यानुसार जिल्ह्यातील घराघरापर्यंत आता लसीकरण मोहीम राबविण्यात येईल, अशी माहिती जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी दिली आहे. या व्हिडिओ कॉन्फरन्सला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे, सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी मीनल करनवाल, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. चारुदत्त शिंदे, जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेंद्र चव्हाण उपस्थित होते.
नागरिकांचे 100% लसीकरणासाठी गावनिहाय पथकांची नियुक्ती -
जिल्हाधिकारी खत्री यांनी सांगितले, आगामी काळात कोविड प्रतिबंधक लसीकरणाला गती देण्यात येईल. जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकाने पहिला डोस घेवून दुसरा डोस घेण्यासाठी व्यापक स्तरावर अभियान राबविण्यात येईल. तशा सूचना आरोग्य विभागाला दिल्या आहेत. प्रत्येक गावात 100 टक्के लसीकरण होण्यासाठी आरोग्य विभाग, महसूल, ग्रामविकास विभागाच्या क्षेत्रीय कर्मचाऱ्यांची मदत घेतली जाईल. लसीकरणासाठी गावनिहाय पथके गठित करण्यात येतील. या पथकांनी नेमून दिलेले गाव 100 टक्के लसीकरण होईल, असे नियोजन करण्यात येणार आहे. याशिवाय घरोघरी जावून लसीकरण केले जाईल. बाजाराच्या दिवशी लसीकरण शिबिरांचे आयोजन करण्यात येईल. नागरिकांनी लसीकरण करून घ्यावे म्हणून लोकप्रतिनिधी, सामाजिक संस्था, स्वयंसेवी संस्थांची मदत घेण्यात येईल.
दोन डोस झालेल्या नागरिकांनाच कार्यालयांमध्ये प्रवेश -
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव, भीती अद्याप संपुष्टात आलेली नाही. त्यामुळे नागरिकांनी दिवाळीसारख्या सणासुदीच्या काळात काळजी आणि खबरदारी घेणे आवश्यक आहे. तसेच 18 वर्षांवरील ज्या नागरिकांनी कोरोना विषाणूचा दुसरा डोस घेतलेला असेल अशाच तरुणांना, नागरिकांना महाविद्यालय, बँक, टपाल कार्यालय, शासकीय, निमशासकीय कार्यालयात प्रवेश मिळणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील 18 वर्षांवरील प्रत्येक नागरिकाने लसीकरण करून घेणे आवश्यक आहे. त्यामुळे नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. तसेच ज्या नागरिकांना पहिला डोस घेवून पुरेसा कालावधी पूर्ण झाला आहे. त्यांनी तातडीने दुसरा डोस घेवून कोरोना विषाणूचा प्रतिबंध करण्यासाठी पुढे यावे, असेही आवाहन जिल्हाधिकारी खत्री यांनी केले आहे.
नागरिकांनी दीपोत्सवात मास्क वापरत सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे -
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव लक्षात घेता यावर्षीचा दीपावली उत्सव कोविड कालावधीत आतापर्यंत साजऱ्या केलेल्या अन्य उत्सवांप्रमाणेच पूर्ण खबरदारी घेऊन साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार नागरिकांनी दीपावलीच्या काळात मास्क वापरावा आणि सोशल डिस्टन्सिंगचे पालन करीत शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करुन साजरा करावा, असे आवाहन जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी केले आहे. कोविड 19 संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता ‘ब्रेक द चेन’ अंतर्गत दिलेल्या मार्गदर्शक सूचनाचे पालन करावे. कोविड संसर्गामुळे बंद करण्यात आलेली धार्मिक स्थळे खुली करण्यात आली असली तरीही दिपावली उत्सव हा घरगुती स्वरुपात मर्यादित राहील याची दक्षता नागरिकांनी घ्यावी. दिपावली उत्सावादरम्यान कपडे, फटाके, व इतर वस्तू खरेदी करण्यासाठी दुकानांत व रस्त्यावर गर्दी टाळावी, विशेष करुन ज्येष्ठ नागरिक तसेच लहान बालके यांनी घराबाहेर पडण्याचे शक्यतो टाळावे. नागरिकांनी गर्दी टाळावी व मोठ्या प्रमाणात एकत्रित येऊ नये, वारवांर हात धुणे, मास्क आणि सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे.
हेही वाचा - DIWALI 2021: महाराष्ट्रासह देश-विदेशातील महागड्या मिठाई.. 'या' 10 मिठाईंची किंमत ऐकून बसेल धक्का