नंदुरबार Sarangkheda Horse Festival : सारंगखेडा घोडे बाजारात दाखल झालेल्या उत्तर प्रदेशातील बरेली येथील 'राधा' घोडीची चर्चा आहे. तिची अदा, सौंदर्य, चाल आणि रुबाबाने यात्रेकरूंचे लक्ष वेधले आहे. तिची किंमत १० लाख नाही १५ लाख नाही तर तब्बल १ कोटी रुपये आहे. आता पर्यंत ७० लाखांपर्यंत तिची बोली लागली आहे. मात्र, मालक नजीमभाई यांना ही घोडी विक्री करायची नाही. कारण ती जातिवंत असल्याने ते त्यांच्या अश्वशाळेत अश्वपैदास करण्यासाठी तिचा वापर केला जातो. त्यातून मिळणारे उत्पन्न जास्त असल्याचे ते सांगतात. (horse market at Sarangkheda)
यात्रेत 'राधा' घोडीने वेधले लक्ष : या घोडीची उंची ७२ इंच इतकी आहे. देशात होणाऱ्या अश्व स्पर्धांमध्ये 'राधा' सहभाग घेऊन मालकाचा सन्मान वाढवत आहे. तिने अनेक पारितोषिकं जिंकली आहेत. देशातील सर्वांत उंच घोडी असल्याचा दावा मालकाने केला आहे. ही मारवाड जातीची असून पांढरी शुभ्र आहे. तिच्या खानपानाची विशेष काळजी घेतली जात असते. तिला दिवसाला ७ लिटर दूध तसंच मका, राईचे तेल, बदाम, गावरान अंडी दिली जातात. तिची देखभाल करण्यासाटी ३ जण तैनात असतात. घोड्याची उंची आणि त्याच्या सौंदर्यावर, त्याच्या जातीवरून त्याची किंमत ठरत असते. या वर्षी घोडे बाजारात अनेक किमती घोडे दाखल होण्यास सुरुवात झालीय. यात्रेत चार राज्यातून घोडे स्पर्धेसाठी दाखल होणार असल्याची माहिती उत्सव समितीचे अध्यक्ष जयपालसिंग रावल यांनी दिली आहे.
सुमारे तीन हजार घोडे यात्रेत दाखल : सारंगखेडा यात्रा अश्वांसाठी प्रसिद्ध असल्याने देशभरातून अश्व प्रेमी आणि व्यापारी सारंगखेडा येथे दाखल होत असतात. यात्रेच्या पहिल्याच दिवशी सुमारे 3000 जातीवंत घोडे दाखल झाले आहेत. या यात्रोत्सवात विविध प्रजातींचे घोडे दाखल होत असतात. त्याचबरोबर अश्व स्पर्धेत देखील सहभागी होण्यासाठी नामवंत घोडे व्यापारी व अश्वशौकीन स्पर्धेत भाग घेत असतात.
हेही वाचा: