नंदुरबार - महामार्गावरून जाणाऱ्या प्रवाशांसाठी निवारा आणि भोजनाची व्यवस्था करण्यात यावी. यासाठी स्थानिक तहसीलदारांशी समन्वय साधावा, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी दिले आहेत. यामध्ये सार्वजनिक बांधकाम विभाग आणि जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागामार्फत येणारे रस्ते अंतर्भूत आहेत.
कोरोनाच्या प्रतिबंधासाठी लॉकडाऊन लागू झाल्यानंतर अनेक मजूर आणि कामगार स्वत:च्या राज्यात परतण्याच्या प्रयत्नात आहेत. तसेच बरेचसे जिल्ह्यातील विविध भागात अडकल्याने त्यांच्या उपजीविकेची आणि निवाऱ्याची समस्या निर्माण झालीय.
सीमावर्ती भागात अशा स्थलांतरीत कामगारांना अलगीकरण कक्षात ठेऊन त्यांना मुलभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अश्या सुचना वैद्यकीय अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. तसेच यासाठी लागणाऱया निधीची पूर्तता जिल्हा प्रशासनाकडून होणार आहे.
जिल्हा प्रशासनामार्फत जिल्ह्यात अडकलेल्या बाहेरगावातील कामगारांच्या निवारा व भोजनाची व्यवस्था करण्यात येणार असून अशा कामगारांनी गर्दीने प्रवास करू नये, असे आवाहन देखील त्यांनी केले आहे. संचारबंदीच्या काळात मानवतावादी दृष्टीकोनातून मदत करू इच्छिणाऱ्यारा व्यक्ती आणि संस्थांनी प्रशासनाशी संपर्क साधावा आणि अधिकृत ठिकाणीच मदतीची रक्कम किंवा वस्तू द्याव्या, असे त्यांनी सांगितले आहे.
आदिवासी विकास विभागामार्फत शाळांना सुटी देण्यात आल्याने शिल्लक असलेली अंडी आणि दुधाच्या टेट्रापॅकची माहिती संकलीत करण्यात आली असून त्याचे गरजूंना वाटप करण्यात येत आहे. आतापर्यंत 90 मजूरांना याचे वाटप करण्यात आले असून मागणीनुसार साठा असेपर्यंत हे वाटप सुरू राहणार असल्याचे उपजिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी सांगितले. शहादा उपविभागीय अधिकारी चेतन गिरासे यांनी सोशल मीडियावर विविध संस्थाना 4 ते 5 दिवस उपयोगात येईल, अशा जीवनावश्यक वस्तूंचे कीट देण्याचे आवाहन केले आहे. यामध्ये 5 किलो गव्हाचे पीठ, 2 किलो तांदूळ, अर्धा किलो तूरडाळ, 1 किलो सोयाबीन तेल, 1 किलो साखर, 200 ग्रॅम चहा, चटणी, हळद, साबण अशा साधारण 500 रुपये किंमतीच्या वस्तूंचा समावेश आहे.
टाटा ट्रस्ट आणि खिदमत फाऊंडेशनने त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद दिला असून ट्रस्टच्या ‘सिनी’ उपक्रमाच्या माध्यमातून 1700 कीट उपलब्ध होणार आहेत. तर खिदमत फाऊंडेशनमार्फत 300 कीट उपलब्ध होणार आहेत. गरजेनुसार अधिक कीट उपलब्ध करून देण्याची तयारी देखील दोन्ही संस्थांनी दर्शवली आहे. आपत्ती काळात गरजूंना मदत करण्यासाठी दानशूर व्यक्ती किंवा संस्थांनी लक्ष्मण कोळी (8329817033), संदिप टेंभेकर (8669132723) किंवा चेतन गांगुर्डे (8275563939) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन गिरासे यांनी केलंय. नंदुरबार तालुक्यातील शिवभोजन योजनेअंतर्गत दररोज 200 थाळींचे वितरण करण्यात येत आहे. स्त्रीशक्ती संस्था, सिंधी युवक मित्र मंडळ, चंदुभैय्या मित्र मंडळातर्फे देखील भोजन व आवश्यक वस्तूंचे वाटप करत आहेत. तसेच युवारंग फाउंडेशन तर्फे बंदोबस्ताससाठी तैनात पोलीस आणि इतर कर्मचाऱ्यांना चहा, नाश्ता व भोजनाचे वाटप करण्यात येत आहे. या व्यतिरिक्त विविध संस्था आणि व्यक्ती मदतीसाठी पुढे सरसावल्या आहेत.