नंदुरबार - कोरोना रूग्णांची संख्या फक्त नंदुरबार जिल्ह्यातच नव्हे तर राज्यभर वाढत आहे. वैद्यकीय सेवेसाठी जिल्हा प्रशासन अतोनात प्रयत्न करत आहे. वैद्यकीय सेवेसाठी लागणारा कर्मचारी वर्ग अपूर्ण आहे. अशा परिस्थितीत विविध समस्यांवर मात करून जिल्हा प्रशासन योग्य पद्धतीने काम करत आहे. लोकप्रतिनिधींना काहीतरी चुकीची माहिती मिळाल्याने त्यांनी जिल्हा प्रशासनावर आरोप केला असावा, अशी प्रतिक्रिया जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारूड यांनी दिली आहे.
लोकप्रतिनिधींनी जिल्हा प्रशासनावर केले आरोप -
नंदुरबार जिल्ह्यात गेल्या मार्च महिन्यापासून कोरोनाबाधित रूग्णांच्या संख्येत प्रचंड वाढ झाली आहे. काही रूग्णांचा वेळेवर उपचार न मिळाल्याने मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात नऊ हजारपेक्षा अधिक बाधित रूग्ण असून शासकीय व खासगी रूग्णालयांमधील आरोग्य व्यवस्था अपुरी पडत आहे. त्यातच रेमडेसीवीर इंजेक्शनचा तुटवडा मोठ्या प्रमाणात आहे. या सर्व परिस्थितीला जिल्हाधिकाऱ्यांचा मनमानी कारभार जबाबदार असल्याचा आरोप खासदार डॉ. हिना गावित व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष डॉ. अभिजीत मोरे यांनी केला होता.
जिल्हा प्रशासनावर आरोप करण्यापेक्षा सहकार्य करावे -
लोकप्रतिनिधींनी जिल्हा प्रशासनावर आरोप करण्याऐवजी कोरोनाबाबत जनजागृती करून नागरिकांना लसीकरणासाठी प्रोत्साहित करावे, असा सल्ला जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे. जिल्हा प्रशासनाला येत असलेल्या विविध समस्यांवर मात करण्यासाठी मदत करावी, असे आवाहन देखील केले आहे.
लोकप्रतिनिधींना मिळाली चुकीची माहिती -
लोकप्रतिनिधींनी पूर्ण माहिती न घेता आरोप केले आहेत. जिल्ह्यात अत्यंत कमी आरोग्य कर्मचाऱ्यांद्वारे कोवीडची परिस्थिती हाताळली जात आहे. गेल्या सहा महिन्यात जिल्ह्यात 27 रूग्णवाहिका व दोन शववाहिका तसेच आरटी-पीसीआर लॅब उपलब्ध करण्यात आल्या. जवळपास सर्वच तालुक्यांमध्ये कोविड केअर सेंटर सुरू करून रुग्णांना सेवा देण्याचे काम सुरू आहे. अगोदरपासून जिल्ह्यात आरोग्य व्यवस्था मजबूत नसल्याने कोवीड काळात सुविधा अपुऱ्या पडत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी ग्रामीण भागातील नागरिकांना कोवीड आजार व लसीकरणाच्या जनजागृतीसाठी पुढाकार घेऊन प्रशासनाला सहकार्य करावे, अशी अपेक्षा असल्याचे डॉ. भारूड म्हणाले.
हेही वाचा - जिल्ह्यातील कोरोना उद्रेकाला जिल्हाधिकारी जबाबदार; खासदार हीना गावितांचा आरोप