नंदुरबार - जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. खासगी रुग्णालयात बेड उपलब्ध नाहीत तर जिल्हा रुग्णालयात देखील अशीच परिस्थिती आहे. यातच उपचार घेत असलेल्या रुग्णांना ऑक्सिजन उपलब्ध होत नसल्याने, थेट नातेवाईकांनीच ऑक्सीजन सिलींडर पळवल्याची घटना समोर आली आहे. दरम्यान या घटनेवर प्रतिक्रिया देताना नागरिकांनी घाबरू नये, जिल्हा रुग्णालयात ऑक्सिजन सिलींडरचा मुबलक साठा आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.
जिल्हा रुग्णालयात ऑक्सिजन सिलींडरसाठी नातेवाईकांची गर्दी
जिल्हा रुग्णालयात गेल्या काही दिवसांपासून रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे. त्यातच ऑक्सीजन बेड उपलब्ध नसल्याची अफवा पसरली होती. दरम्यान या अफवेमुळे ऑक्सीजन सिलींडरचे वाहन जिल्हा रुग्णालयात दाखल होताच, रुग्णांनी थेट वाहनातून सिंलींडर काढून रुग्णांजवळ आणले. दरम्यान गेल्या दोन दिवसांपासून रुग्णांना ऑक्सिजन सिलींडर मिळत नसल्याचा बातम्या येत आहेत, त्यामुळे रुग्णांच्या नातेवाईंकानी असा प्रकार केल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
रुग्णालयात ऑक्सीजन मुबलक प्रमाणात उपलब्ध - जिल्हाधिकारी
नंदुरबार जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णाची संख्या वाढत आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात आठ हजारांपेक्षा अधिक रुग्ण उपचार घेत असून, गेल्या 5 दिवसांत 70 पेक्षा जास्त जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. जिल्हा ग्रामीण रुग्णालयात एकूण 220 बेडसाठी दोन ऑक्सिजन प्लॅन्ट आहेत. त्यातून 150 बेडसाठी ऑक्सिजन तयार होतो. मात्र वाढत्या रुग्णांमुळे ते कमी पडत आहेत, त्यामुळे धुळ्याहून दररोज १५० सिलींडर जिल्हा रुग्णालयात येत आहेत. मात्र सिलींडरची कमतरत असल्याची अफवा पसरल्याने, रुग्णांच्या नातेवाईकांनी ऑक्सिजन सिलींडर घेऊन येणाऱ्या वाहनाभोवती गराडा घातला, व मिळेल ते सिलींडर घेऊन ते रुग्णांपर्यंत पोहोचले. मात्र याची माहिती रुग्णालय प्रशासनाला कळताच, त्यांच्याकडून ऑक्सिजन सिलींडर मुबलक प्रमाणात असल्याची माहिती देण्यात आल्याने परिस्थित नियंत्रणात आल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारुड यांनी दिली आहे.