नंदुरबार - दोंदवाडे ग्रामपंचायतीत रोजगार हमी योजनेअंतर्गत केलेल्या रोपवाटिकेच्या कामात लाखोंचा भ्रष्टाचार झाल्याप्रकरणी संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
शहादा तालुक्यातील दोंदवाडे ग्रामपंचायतीने रोजगार हमी योजनेअंतर्गत गावात रोपवाटिका तयार केली होती. त्या रोपवाटिकेच्या कामात लाखो रुपयाचा भ्रष्टाचार झाल्याची तक्रार काही ग्रामस्थांनी केल्यानंतर याप्रकरणाची चौकशी करण्यात आली. या चौकशीत तत्कालीन सरपंच वैशाली पाटील आणि ग्रामसेवक दोषी आढळून आले होते. विभागीय आयुक्तांनी त्यांच्याकडून अपहार झालेली रक्कम वसूल करण्याचा आदेश दिला होता मात्र, जिल्हा परिषद प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे संबंधितांवर फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करावेत अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. तसेच जिल्हा प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले तर ग्रामस्थ 2 ऑक्टोबर पासून जिल्हा परिषदेसमोर आमरण उपोषण करतील असा इशारा देण्यात आला आहे.
हेही वाचा - तोरणमाळचे सौंदर्य फुलले, मात्र पर्यटकांच्या सुविधांचा अभाव