नंदुरबार - एका शासकीय अधिकार्यासह दोघांना कोरोनाची लागण झाल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे. नंदुरबार येथील 48 वर्षीय अधिकारी, 51 वर्षीय पुरूष आणि रनाळ्यातील 35 वर्षीय महिलेचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. बाधित आधिकारीच्या संपर्कातील 2 जण, पुरुषाच्या संपर्कातील 5 जण आणि महिलेच्या संपर्कातील 9 जण अशा एकूण 16 जणांना आरोग्य विभागाने क्वॉरंटाईन केले आहे.
रनाळ्यातील महिला ही मुंबईतील मुलुंड येथून आली होती. तर नंदुरबारमधील पुरुष हा नाशिक येथे उपचारासाठी गेला होता. प्रशासनाने बाधितांच्या वास्तव्याचा परिसर कन्टेंमेन्ट झोन करुन निर्जंतुकीकरण फवारणी केली आहे. जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांचा आकडा 40 वर पोहोचला असून त्यातील तिघांचा मृत्यू झाला. तर 28 जण बरे होऊन घरी परतले असून 9 बाधित जिल्हा रुग्णालयात उपचार घेत आहेत.
नंदुरबार येथील 48 वर्षीय पुरुष हा प्रशासनातील अधिकारी असून त्यांच्या संपर्कातील दोन जणांना आरोग्य विभागाने क्वॉरंटाईन केले आहे. या अधिकार्याचे धुळे येथे निवासस्थान असून त्याच्या कुटुंबातील सदस्यांना तेथेच क्वॉरंटाईन करण्यात आले आहे. तर कोरोनाबाधित आढळलेल्या अधिकार्याला नंदुरबार जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
शहरातील मच्छीबाजार परिसरातील 50 वर्षीय पुरुष हा हृदयावरील उपचारासाठी नाशिक येथे गेला होता. तेथे सदर व्यक्तीने कोविड चाचणी केली असता, त्याचा अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाला आहे. त्यामुळे हा व्यक्ती नाशिकहून परत आल्याने त्याच्यावर नंदुरबार जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या बाधितांच्या संपर्कातील पाच जणांना आरोग्य विभागाने क्वॉरंटाईन केले आहे.