नंदुरबार - कोरोनाशी मुकाबला करण्यासाठी सरकारने संचारबंदी आणि लॉकडाऊनसारखी पाऊले उचली. मात्र, याचा फटका गावखेड्यात राहणाऱ्या कष्टकऱ्यांना बसला आहे. हातावर पोट असलेल्या कष्टकऱ्यांना काम केले तरच दोन वेळची भाकरी मिळते. त्यामुळे सध्याच्या परस्थितीमध्ये त्यांची दयनीय अवस्था झाली आहे.
त्यात कुटुंबातील सदस्यांचे आजारपण असेल, तर त्यासाठी लागणारा खर्च वेगळा. अशाच परिस्थितीत आठ दिवस घरात बसल्यावर परिवाराची उपासमारी होती. त्यामुळे लॉकडाऊन मोडून आपला व्यवसाय लावण्याचा निर्णय घेतला. मात्र, संचारबंदी असल्याने त्यांना दुकाने लावू दिली नाहीत.
नानजी आहिरे शहादा शहरातील झोपडपट्टीत राहतात. त्यांचा बूट पॉलिश करण्याचा व्यवसाय आहे. घरात ते एकटे कमावते असल्याने कुटुंबाचा उदरनिर्वाह त्यांच्यावरच चालतो. मात्र, आठ दिवसांपासून सर्व काही बंद असल्याने उपासमारीची वेळ त्यांच्यावर आली आहे. नानजी आहिरेसारखे अनेक परिवार लॉकडाऊनमुळे बेजार झाले आहेत. अशा कुटुंबांसाठी समाजिक आणि वैद्यकीय सेवा देणाऱ्या संस्थांनी ग्रामीण भागात पुढे यावे ही त्यांची अपेक्षा आहे.