नंदुरबार - बाल सुधारगृहातील बालकांची मानसिकता कमी नसून तेही सर्वसाधारण मुलांसोबत विविध स्पर्धांमध्ये सहभागी होवू शकतात. त्यांच्यात स्पर्धा निर्माण होवून इतर मुलांप्रमाणे त्यांचीही प्रगती व्हावी, यासाठी क्रीडा स्पर्धा महत्वाचे असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारुड यांनी सांगितले. महिला व बाल विकास विभागांतर्गत स्वंयसेवी संस्थांमधील बालके व नंदुरबार शहरातील विविध शाळांमधील मुले यांच्यासाठी जिल्हा क्रीडा संकुलात 'चाचा नेहरु बालमहोत्सवा'चे उद्घाटन भारुड यांच्या हस्ते झाले.
हेही वाचा - 'एकेरीमध्ये भारतीय बॅडमिंटनपटूंची कामगिरी चिंताजनक', गोपीचंद यांचा ईटीव्ही भारतकडे खुलासा
जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित म्हणाले, विद्यार्थ्यांमधील कला गुणांना वाव देण्यासाठी अशा स्पर्धा आयोजित करणे अत्यंत आवश्यक असून, शिक्षणासोबतच इतर उपक्रम आयुष्यात महत्वाचे आहे. नंदुरबार जिल्ह्यातील विद्यार्थी कला गुणांमध्ये मागे नाहीत हे या स्पर्धांमधून दिसून येईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले. बाल महोत्सवात एकूण 82 संस्था व शाळांनी सहभाग घेतला आहे. सांघिक खेळ, सांस्कृतिक कार्यक्रम व वैयक्तीक खेळ घेण्यात येत आहेत. 6 ते 14 वयोगटातील एकूण 128 मुले व 246 मुली सहभागी झाल्या आहेत, तर 15 ते 18 वयोगटातील एकूण 108 मुले व 124 मुली सहभागी झाल्या आहेत. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी विनोद वळवी, सुत्रसंचालन डॉ. उमेश शिंदे यांनी केले. आभार जिल्हा परिविक्षा अधिकारी जी. ए. जाधव यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जिल्हा महिला बालविकास कार्यालयाचे जिल्हा संरक्षण अधिकारी भरत राणे, परिविक्षा अधिकारी दिनेश लांडगे, विधी सल्लागार एस.डी. वळवी यांनी परिश्रम घेतले.
कार्यक्रमास जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडीत, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी विनोद वळवी, शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार प्राप्त बळवंत निकुंभ, बाल कल्याण समिती सदस्य मधुकर देसले, नितीन सनेर, सदस्या सीमा सुर्यवंशी, दावलशा बाबा महिला उन्नती मंडळाचे अध्यक्षा वंदना तोरवणे, काठोबा देव शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष रोहिदास राठोड, श्रीयाद मुलींच्या बालगृहातील अध्यक्ष डी.एस.बच्छाव, रुख्माबाई मुलींचे बालगृह सोरापाडाचे अध्यक्ष प्रकाश पाटील, निर्मल मुलींचे बालगृहाचे अध्यक्ष विवेक पाटील आदी उपस्थित होते.
हेही वाचा - 'सिंहासन' चित्रपटाप्रमाणे राज्याच्या राजकारणात घडामोडी घडताहेत - एकनाथ खडसे