नंदुरबार - राज्यातील प्रमुख मिरची उत्पादक म्हणून नंदुरबार जिल्ह्याची ओळख आहे. त्याचबरोबर बाजारपेठ देखील सर्वात मोठी आहे. मात्र, यावर्षी मिरचीचे उत्पादन प्रचंड घटणार असल्याने मिरचीला बाजारपेठेत तेजी राहणार आहे. पिकावरील विषाणूजन्य प्रादुर्भावामुळे उत्पादनात घट होणार असल्याची शक्यता मिरची उत्पादक शेतकऱ्यांनी वर्तविली आहे.
मिरची उत्पादन घटणार
यंदा नंदुरबार जिल्ह्यात मिरची पिकांवर विषाणूजन्य प्रादुर्भावामुळे उत्पादनात घट होणार असल्याची शक्यता मिरची उत्पादक शेतकऱ्यांनी वर्तविली आहे. यावर्षी जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे शेतात पाणी साचून राहिल्याने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तोच मिरचीवर बुरशीजन्य आणि विषाणूजन्य रोगांचा प्रादुर्भाव झाला. त्यामुळे मिरचीच्या उत्पादन क्षमतेवर परिणाम झाला आहे. त्यामुळे उत्पन्न कमी होण्याची शक्यता मिरची उत्पादक विजय माळी माळी यांनी व्यक्त केली आहे. त्यांनी तेरा एकर क्षेत्रावर मिरची लागवड केली आहे. दरवर्षी त्यांना आतापर्यंत तीनशे क्विंटल मिरचीचे उत्पन्न होत असते. मात्र यावर्षी त्यांना तब्बल ७० टक्के घट आली आहे. गुंतविलेले भांडवल निघणेही अशक्य असल्याचे माळी यांनी सांगितले.
रोगावर लवकरच उपाय शोधून प्रादुर्भाव रोखण्यात मदत होईल व शेतकऱ्यांना या विषाणूजन्य प्रादुर्भावाच्या अडचणीतून बाहेर काढण्यात यश येईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. यंदा मिरचीचे उत्पादन घटणार असल्याने लाल मिरचीचे दर तेजीत असतील, त्याचा फटका सर्वसामन्य माणसाला बसणार आहे. एकूणच नंदुरबार जिल्ह्यात मिरची उत्पादन घटणार आहे. मिरचीवर येणाऱ्या रोगांच्या संशोधनासाठी द्राक्ष आणि केळी प्रमाणे संशोधन केंद्र सुरू करावी ही अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.