नंदुरबार - गेल्या काही दिवसांपासून वातावरणात बदल झाल्याने सकाळी धुके, दुपारी ढगाळ वातावरण आणि दिवसभर थंड वारा वाहू लागला आहे. यामुळे वातावरणातील गारवा वाढल्याने रात्रीपासून ते सकाळी 7 वाजेपर्यंत नंदुरबार शहरासह जिल्ह्यात धुक्याची चादर पसरली आहे. थंडीपासून बचावासाठी उबदार कपडे नागरिक वापरत आहे. त्यामुळे सध्यातरी गुलाबी थंडीत नंदनगरीला धुक्याची दुलई अर्थातच चादर पसरली आहे.
थंडीचा जोर वाढला
गेल्या काही दिवसात अचानक झालेल्या पावसामुळे आता थंडीचा जोर वाढला आहे. परिसरात धुक्याचे वातावरण असल्याने वाहन चालताना चालकांची कसरत होत आहे. गेल्या नंदुरबार शहरासह सातपुड्यातील अल्हाददायक वातावरण जिल्हावासियांना अनुभवायला मिळत आहे. तापमानाचा पारा घसरून 19 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचला आहे.
वातावरणात बदल
पावसाने विश्रांती घेतल्यानंतर थंडी वाढली. तसेच सूर्यदर्शन होत नसल्याने दिवसभर ढगाळ वातावरण कायम राहत आहे. त्यामुळे सध्या सकाळी धुके, दुपारी ढगाळ वातावरण आणि सायंकाळी गार वारे वाहत आहेत. त्यामुळे तापमानात घट झाल्याने थंडीचा अनुभव येत आहे.
उबदार कपड्यांना पसंती
थंडीचा जोर वाढल्याने नागरिकांकडून स्वेटर, मफलर आदी उबदार कपडे वापरण्यास पसंती देत आहेत. सकाळी उठून व्यायामाला बाहेर पडणार्यांची संख्या वाढू लागली आहे. महिला, युवती व ज्येष्ठ नागरीक सकाळी व सायंकाळी शतपावली करण्यास पसंती देत आहे. गेल्या चार दिवसांपूर्वी नागरिकांना अवकाळीच्या हजेरीमुळे पावसाळा व हिवाळा ऋतुचा अनुभव आला.
सातपुड्यात धुक्याची चादर
नंदुरबार जिल्हा सातपुड्याच्या कुशीत आणि तापी व नर्मदा नदीच्या किनारी असल्याने नदीकाठच्या परिसरात गुलाबी थंडीचा अनुभव नागरिकांना येत आहे. गेल्या दोन दिवसांपासून रात्री व सकाळी पसरणार्या धुक्यांमुळे नंदनगरीसह सातपुड्याच्या पर्वत रांगेला धुक्याची चादर ओढल्याचे पहावयास मिळते. गुलाबी थंडीचा अनुभव घेण्यासाठी पर्यटक जिल्ह्यातील तोरणमाळ, वाल्हेरी या ठिकाणांना पसंती देत आहेत.