नंदुरबार - जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण वाढतच आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने धार्मिक कार्यक्रमांसाठी एकत्र येण्यास बंदी घातली आहे. त्यामुळे कोरोनाची साखळी तोडण्यासाठी मुस्लिम बांधवांनी येणारी बकरी ईद ही आपापल्या घरीच साजरी करावी. तसेच प्रशासनाच्या नियमांचे पालन करुन सहकार्य करावे, असे आवाहन उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश पवार यांनी केले. शहरातील मौलाना व काझी यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते.
या बैठकीस उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश पवार, शहर पोलीस निरीक्षक सुनील नंदवाळकर, गोपनीय शाखेचे पोलीस हवालदार जयेश गावित, शैलेंद्र माळी, श्रीकांत पाटील व मौलाना उपस्थित होते.
यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी पवार म्हणाले, कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता जिल्ह्यात पुन्हा संचारबंदी लागू करण्यात आली आहे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये. त्यासाठी शासनाच्या नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. त्यामुळे सामाजिक अंतराचे भान ठेवत कोणतेही धार्मिक कार्य करू नये. बकरी ईदची नमाज घरात अदा करावी. त्याचबरोबर कुर्बानी करताना योग्य ती दक्षता घ्यावी, असे देखील आवाहन यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश पवार यांनी केले. यावेळी उपस्थित काही मौलानांनी मनोगत व्यक्त केले.