नंदुरबार - ग्रामपंचायत निवडणुकीच्या मतदानाची तारीख आता जवळ आली आहे. त्यामुळे उमेदवार मतदारांच्या भेटी घेऊन आपल्याला मतदान करण्याचा आग्रह करत आहेत. निवडणुकींच्या सोबतच शेतीची कामेही मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. त्यातच आवकळी पाऊस झाल्याने शेतकरी शेतातील कापूस वेचणीसाठी मजूर शेतात घेऊन जात आहेत. त्यामुळे उमेदवार आता थेट शेतात जाऊन प्रचार करत आहेत. थेट शेताच्या बांधावर जाऊन उमेदवार मतदारांना आपल्याला मत द्यावे, असे आवाहन करत आहेत.
उमेदवार पोहोचला बांधावर
काही दिवसांपूर्वी जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणावर शेतीचे कामे रखडली होती. मात्र वातावरणात बदल झाल्यामुळे शेतीची कामे वेग धरू लागली आहेत. त्यामुळे गावातील सामान्य नागरिक देखील शेतीच्या कामात व्यस्त झालेत. तर मजूरवर्ग देखील मोठ्या प्रमाणात शेतात व्यस्त झाले आहेत. त्यातच ग्रामपंचायत निवडणूकीचा प्रचार अंतिम टप्प्यात पोहोचत आहे. त्यामुळे उमेदवार थेट मतदारांच्या भेटीसाठी शेताच्या बांधावर पोहोचून प्रचार करत आहेत.
मतदारांचा उमेदवारांना प्रतिसाद
जिल्ह्यात 64 ग्रामपंचायतींसाठी मतदान होणार आहे. यासाठी सर्वात जास्त प्रमाणावर महिला उमेदवार असल्याने प्रचाराची धुरा महिला उमेदवारांसह पुरुष वर्गांना देखील सांभाळावी लागत आहे. शेतीच्या कामात व्यस्त असलेल्या मजुरांना तसेच कामानिमित्त परगावी गेलेल्या स्थलांतरित मतदारांशी संपर्क साधून त्यांना मतदान करण्यासाठी आवाहन करत आहेत. मतदार देखील त्यांना प्रतिसाद देत आहेत.
सोशल मीडियाचा वापर
ग्रामपंचायत निवडणुकीत ग्रामीण भागात देखील सोशल मीडियाचा वापर करून प्रचाराची नवीन धुरा अवलंबली जात आहे. शहरी भागात होणारा सोशल मीडियाचा प्रसार आता ग्रामीण भागातही होताना दिसून येत आहे.
हेही वाचा - डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात महाभियोगाचा प्रस्ताव