नंदुरबार- शहादा तालुक्यातील कहाटुळ येथे एका व्यक्तीच्या घरातून कापसाचे बोगस एचटीबीटी बियाणे जप्त करण्यात आले आहे. तालुका कृषी विभाग शहादा आणि जिल्हा गुणनियंत्रण अधिकारी नुंदुरबार यांनी ही कारवाई केली असून यात एक लाखांचे बियाणे जप्त करण्यात आले आहे.
हेही वाचा- चिंताजनक : रायगडच्या उरण तालुक्यात आतापर्यंत 56 कोरोनाबाधित; आज 27 नवीन रुग्ण आढळले
मे महिनाअखेर कापूस लागवडीला सुरुवात होत. या हंगामात जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर कापूस लागवड केली जाते. मात्र, हंगाम सुरू होण्यापूर्वीच बियाणे विक्रेत्यांकडून बनावट बियाणे विक्री सुरू झाली आहे. कहाटुळ येथील एक व्यक्ती अवैधरित्या कापसाचे बियाने विक्री करीत होता. विशेष म्हणजे हे बियाणे बोगस असल्याची माहिती कृषी विभागाला गोपनीयतेने मिळाली होती. त्याद्वारे कारवाई करून बोगस बियाणे जप्त करण्यात आले.
एचटीबीटी कापूस बियाण्याची जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर लावगड होते. त्यामुळे या बियाणाची मोठी मागणी आहे. मात्र, गेल्या काही वर्षापासून बोगस बियाणे व्यापाऱ्यांकडून विकले जात असल्याच्या तक्रारी शेतकरी करतात. गेल्या हंगामात कृषी विभागातर्फे मोठ्या प्रमाणावर बनावट बियाणे जप्त करण्यात आले होते.
जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी बी.एन.पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका कृषी अधिकारी किशोर हडपे व जिल्हा गुणनियंत्रण अधिकारी नरेंद्र पाडवी यांनी संयुक्तपणे ही कार्यवाही केली आहे. यावेळी मंडळ कृषी अधिकारी राहुल धनगर, कृषी पर्यवेक्षक सुरेश बागुल आणि पोलीस शिपाई प्रकाश अहिरे उपस्थित होते. संबंधित व्यक्तिविरुद्ध गुन्हा नोंदविण्याची कार्यवाही सुरू आहे.
दरम्यान, शेतकऱ्यांनी अधिकृत विक्रेत्याकडूनच बियाणे खरेदी करावे, तसेच बियाणा विषयी काही तक्रार असल्यास तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन कृषी विभागातर्फे करण्यात आले आहे.