नंदुरबार - मुख्यमंत्र्यांच्या जनादेश यात्रेदरम्यान करण्यात आलेल्या बॅनर बाजीतून पक्षातील वाद चव्हाट्यावर आले आहेत. मुंबईत पोलीस निरीक्षक पदावर कार्यरत असलेल्या राजेश पाडवी यांनी मुख्यमंत्र्याच्या स्वागताचे बॅनर शहरात लावले आहेत. राजेश पाडवी हे शहादा-तळोदा मतदारसंघाचे भाजप आमदार उदेसिंग पाडवी यांचे चिंरजीव आहेत. ते स्वत: या मतदारसंघातून इच्छुक असल्याची चर्चा आहे.
कलावाती पाडवी फाउंडेशनचे संस्थापक-अध्यक्ष असलेल्या राजेश पाडवींनी स्वेच्छानिवृत्तीसाठी अर्ज केल्याचे भाजप पदाधिकारी सांगत आहेत. मात्र, या बाबत माध्यमांशी बोलण्यास त्यांनी नकार दिला आहे. थेट बॅनरवरच राजेश पाडवी यांनी पोलीस निरीक्षक, मुंबई असा उल्लेख केल्याने शासकीय सेवेतील व्यक्तींना या प्रकारे राजकीय पक्षाच्या कार्यक्रमांना फलकांच्या माध्यमातून शुभेच्छा देता येतात का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
स्थानिक खासदार डॉ. हिना गावित व आमदार विजयकुमार गावित यांचे स्वागतासंबंधी स्वतंत्र बॅनर अजूनही दिसले नसल्याने जनादेश यात्रेतील त्यांचा सहभागाबद्दल पक्षात विविध चर्चा सुरू आहेत.