नंदुरबार - केंद्र सरकारने मंजूर केलेल्या नव्या कृषी कायद्याविरोधात दिल्लीमध्ये शेतकऱ्यांचे जोरदार आंदोलन सुरू आहे. हा कायदा रद्द करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. मात्र दुसरीकडे भाजप नेत्यांकडून या कायद्याचे समर्थन होताना दिसत आहे. मंगळवारी जागतीक किसान दिनाचे औचित्य साधून, नंदुरबारमध्ये भाजपच्या वतीने केंद्र सरकारकडून निर्माण करण्यात आलेल्या या कायद्यांच्या प्रतिंना दुग्धाभिषेक करण्यात आला. तसेच भाजप कार्यकर्त्यांकडून यावेळी कायद्याच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी खा. हीना गावित आणि जिल्ह्याध्यक्ष विजय चौधरी यांची उपस्थिती होती.
दिल्लीमध्ये सध्या नव्या कृषी कायद्याविरोधात आंदोलन सुरू आहे. मात्र हे नवे कायदे शेतकऱ्यांच्या हिताचे असल्याचे यावेळी आंदोलकांनी म्हटले आहे. भाजपच्या समर्थनार्थ नंदुरबारच्या नेहरू पुतळा चौक परिसरात हे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामध्ये मोठ्या संख्येने भाजपचे कार्यकर्ते सहभागी झाले होते.