नंदुरबार - नवापूर येथील पोल्ट्री मधील कोंबड्यांचे अहवाल आल्यानंतर बर्ड फ्ल्यूची लागण झाल्याचे समोर आले. त्यानंतर राज्यातील सर्वात मोठ्या कलिंग ऑपरेशनला सुरुवात झाली आहे. या पोल्ट्री फार्ममधील अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यांच्या एक किलोमीटर परिसरातील 10 पोल्ट्री फार्ममधील पाच लाख पक्षी अगोदर नष्ट केले जाणार आहेत. यामुळे पोल्ट्री व्यावसायिक यांचे कोट्यवधीचे नुकसान होणार आहे. तर यावर अवलंबून असलेल्या उद्योगातील हजारो तरुण बेरोजगार होणार असल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
नवापुरात चार पोल्ट्री फार्ममध्ये बर्ड फ्लू -
नवापुरमधील चार पोल्ट्री फार्ममधील कोंबड्यांना बर्ड फ्ल्यू झाल्याचे समोर आले. त्यानंतर सुरू करण्यात आलेल्या कलिंग ऑपरेशनमध्ये रविवारी दिवसभरात 200 पशुवैद्यकीय विभागाच्या कर्मचाऱ्यांनी 34 हजार कोंबड्या नष्ट केल्या. आज कर्मचारी संख्या वाढल्याने 70 हजार कोंबड्या नष्ट केल्या जातील. अगोदर 4 पोल्ट्रीमधील दीड लाख पक्षी नष्ट केले जातील. त्यानंतर एक किलोमीटर परिसरात येणाऱ्या पोल्ट्रीमधील 4 लाख 90 हजार पक्षी नष्ट केले जाणार आणि उर्वरित पक्षा संदर्भात पाठविलेले अहवाल आल्यानंतर निर्णय घेण्यात येणार आहेत. पहिल्या टप्प्यात जवळपास 6 लाख कोंबड्या नष्ट केल्या जातील तर दुसऱ्या टप्प्यात उर्वरित 3 लाख कोंबड्या नष्ट केल्या जाणार आहेत, याची माहिती जिल्हाधिकारी यांनी दिली.
हेही वाचा - कृषी कायद्यावरून मोदींची नरमाईची भूमिका! चर्चेची तयारी दर्शवित विरोधकांना सहकार्याचे आवाहन
पोल्ट्री व्यावसायिकांचं मोठं नुकसान -
बर्ड फ्ल्यूनंतर व्यापाऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. नवापूर येथील पोल्ट्री धारकांचे मोठ्या प्रमाणात नुकसानामुळे शासन निर्णयानुसार मिळणारे नुकसान भरपाई तोडकी आहे. कोंबड्यांसोबत अंडी आणि कोंबड्यांचे खाद्य नष्ट केले जात असल्याने होणारे नुकसान मोठे आहे. नवापूरमध्ये जवळपास 15 कोटींचे नुकसान झाले आहे, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. एकूणच पोल्ट्री व्यवसाय नष्ट होण्याचा मार्गावर आहे. या सर्व बाबीमागे पशुसंवर्धन विभागाची अनास्था ही कारणीभूत असल्याचे चित्र दिसून येत आहे.