नंदुरबार - चौथ्या टप्प्यात नंदुरबार लोकसभा मतदारसंघात सर्वत्र शांततेत मतदान झाले. मतदारांनी कडक उन्हाची पर्वा न करता उत्साहाने मतदान केले. हाती आलेल्या प्राथमिक माहितीनुसार अंदाजे ६८.९९ टक्के मतदान झाले आहे. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत ६६.७५ टक्के मतदान झाले होते.
जिल्ह्यात सकाळपासूनच मतदान केंद्रांवर नागरिकांची गर्दी दिसून आली. सायंकाळी ६ वाजेनंतरही काही मतदान केंद्रांवर मतदान सुरु होते. मतदान करण्याच्या टक्केवारीत जिल्ह्याने बाजी मारली आहे. सकाळी ७ वाजता मतदानाला सुरुवात झाली.
नंदुरबार लोकसभा मतदारसंघातील अक्कलकुवा विधानसभा मतदारसंघ मतदान टक्केवारीत अव्वल ठरला. जिल्ह्यातील २१५ मतदार केंद्रातून वेब कास्टींग करण्यात आले. नियंत्रण कक्षातील पडद्यावर या मतदान केंद्रातील हालचालींवर लक्ष ठेवण्यात येत होते. तंत्रज्ञानाच्या सहाय्याने निवडणूक प्रक्रीया अधिक सुलभ झाल्याचे दिसून आले. मतदानाच्या टक्केवारीत बाजी मारणारा नंदुरबार मतदार संघ मात्र विकासाच्या टक्केवारीत पिछाडीवर आहे.
जिल्हाधिकारी बालाजी मंजुळे यांनी ऊर्दु हायस्कूल येथे मतदानाचा हक्क बजावला. त्यांनी त्यानंतर शहरातील मतदान केंद्रांना भेट दिली.
विधानसभा मतदारसंघनिहाय टक्केवारी
अक्कलकुवा - ७३.४३
शहादा तळोदा - ७२.००
नंदुरबार - ६२. ०२
नवापुर - ७२.००
साक्री - ६६.००
शिरपूर - ७०.००