नंदुरबार - शहादा तालुक्यातील मडकाणी गावात असलेला बनावट देशी-दारुचा कारखाना उद्ध्वस्त करण्यात आला आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने ही कारवाई केली. तर यावेळी झालेल्या कारवाईत २ संशयित आरोपी फरार झाले आहेत.
शहादा तालुक्यातील मडकाणी गावात बनावट देशी-दारूचा कारखाना सुरु असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा यांना मिळाली होती. त्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने सापळा रचला आणि बनावट देशी-दारू कारखान्याच्या आजुबाजूला घेराबंदी केली. यानंतर जंगल परिसरात एका झोपडीत बनावट देशी-दारूच्या कारखान्यात पथकाने छापा टाकला. कारखान्यावर छापा पडल्याचे समजताच दोघेही संशयित आरोपी जंगलात पसार झाले.
हेही वाचा - हिंगोलीत धुमाकूळ घालणाऱ्या वाघाचा शेतकऱ्यांवर हल्ला; पाच जण गंभीर जखमी
या कारवाईत कारखान्यातुन 49 हजार 900 रुपये किमतीचे बनावट देशी दारूच्या 960 बाटल्या, 22 हजार 500 रुपये किंमतीचे 110 लिटर स्पिरीट, 5 हजार रुपये किंमतीचे दारुच्या बाटल्या सिलबंद करण्याचे मशिन, 1 हजार रुपये किंमतीचे अल्कोहोल प्रमाण मोजण्याचे मशिन, 2 हजार रुपये किमतीच्या काचेच्या रिकाम्या बाटल्या, असा एकूण 80 हजार रुपयाचा मुद्देमाल पथकाने जप्त केला. जिल्ह्यातील मध्य प्रदेश महाराष्ट्र सीमावर्ती भागात मोठ्या प्रमाणात बनावट दारू बनवण्याचे कारखाने आहेत. या कारवाईनंतर त्यांच्यावरही कारवाई करण्यात यावी, अशी मागणी पुढे येत आहे.
हेही वाचा - धक्कादायक.. नाशिकच्या दिंडोरी तालुक्यात दहा महिन्यात १६ शेतकऱ्यांच्या आत्महत्या