नंदुरबार - नवापूर नगरपालिका हद्दीतील गुजरगल्ली ते कुंभारवाडा दरम्यान असलेल्या रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम सुरु आहे. परंतु गटार लाईन करण्याआधीच रस्त्याचे काम होत असल्याने या कामाला परिसरातील नागरिकांनी विरोध केला आहे. रस्ते डांबरीकरणाचे काम थांबवण्यात यावे, या मागणीसाठी भाजपाच्या पदाधिकार्यांसह नागरिकांनी पालिकेत जाऊन घोषणाबाजी करत बांधकाम विभागाच्या अधिकार्यांना धारेवर धरले. तसेच अधिकार्यांना बांगड्यांचा आहेर देत निवेदन देण्यात आले.
निकृष्ट दर्जाच्या कामाला केला विरोध
नवापूर नगरपालिकेजवळ भाजपाचे पदाधिकारी व कुंभारवाडा भागातील रहिवाशांनी निकृष्ट दर्जाच्या रस्त्याच्या कामा विरोधात घोषणाबाजी केली. तसेच बांधकाम विभागाच्या अधिकार्यांना धारेवर धरत बांगड्यांचा आहेर देऊन निवेदन सादर करण्यात आले.
बांधकाम अधिकार्यांना बांगड्यांच्या आहेरासह निवेदन
शहरातील प्रभाग क्रमांक 6 कुंभारवाडा येथील कुंभारवाडा ते नवनीत पंचाल यांच्या घरापर्यंत डांबरीकरण रस्त्याचे काम नवापूर नगरपरिषदेमार्फत सुरु आहे. सदर ठिकाणी 20 वर्षांपुर्वीची असलेली गटारलाईन पुर्ववत सुस्थितीत सुरु करण्यासाठी नवीन गटार लाईन करण्याची मागणी केली. परंतु याकडे दुर्लक्ष करुन रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम सुरु केले आहे. या रस्ते डांबरीकरणाला नागरिकांनी विरोध केला आहे. तसेच सदर गटार लाईन तात्काळ सुरु करणे आवश्यक आहे. आर्थिक वर्ष 1995 पासून सदर रस्त्याचे काम सुरु असून त्यामुळे रस्त्याची उंची वाढली असून यामुळे नागरिकांच्या घराच्या पायर्या देखील या रस्त्यामुळे दबल्या गेल्या आहेत. या रस्त्याच्या कामात रस्त्याची उंची वाढल्याने रस्ता पुर्ण खोदून पुन्हा बनवल्यास नागरिकांना व रहिवाशांना सोयीचे होणार आहे. आता रस्त्याचे काम सुरु झाले व रस्ता पुर्णत्त्वास आल्यास रस्त्याच्या उंचीमुळे तसेच गटार लाईनही लहान असल्याने पाणी बाहेर तुंबेल व रहिवाशांच्या घरात घुसण्याची शक्यता नाकारता येत नाही. रस्त्याचे खोदकाम करुन रस्त्याची उंची ही अर्धा फुट करण्यात यावी. रस्त्याच्या खाली असलेली गटारलाईन मोठ्या स्वरुपाची करुन मिळावी. तसेच नवीन होत असलेला रस्ता हा अर्धा फुट खाली करुन मिळावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा
मागणी पूर्ण झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा भाजपाचे अल्पसंख्याक प्रदेश उपाध्यक्ष एजाज शेख, प्रदेश आदिवासी उपाध्यक्ष अनिल वसावे, जयंती अग्रवाल, हेमंत जाधव, नगरसेवक महेंद्र दुसाणे, निलेश प्रजापत, जीतू अहिरे, स्वप्निल मिस्त्री, घनशाम परमार, कमलेश छत्रीवाला, कुणाल दुसाणे, अनिल सोनार, गुलाम आमलीवाला, जयेस प्रजापत, विनोद प्रजापत, रामु प्रजापत, सुरेश प्रजापत आदींनी दिला आहे. यावेळी तहसिलदार मंदार कुलकर्णी यांनी कुंभारवाडा रस्त्यांची पाहणी केली.