शहादा (नंदुरबार) - दोंडाईचा रस्त्यावरील हरियाली इंडस्ट्रील ईस्टेटमधील एका पत्र्याच्या शेडमधुन अवैध पध्दतीने बायो डिझेलचा साठा करुन विकणार्या चार जणांना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. त्यांच्याकडुन 1400 लिटर बायो डिझेलसह मिनी टँकर असा सुमारे सव्वातीन लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
गोपनीय माहितीच्या आधारे कारवाई -
शहादा-दोंडाईचा रस्त्यावरील हरियाली ईस्टेट परिसरात एका पत्र्याच्या शेडमध्ये बेकायदेशीर बायो डिझेलचा साठा करुन त्याची विक्री करण्यात येत आहे. याबाबत गोपनीय माहिती पोलीस निरीक्षक दिपक बुधवंत यांना मिळाली होती. यानंतर बुधवंत यांनी आपल्या पथकासह छापा टाकला. यावेळी कुठलीही अधिकृत परवानगी नसताना बायो डिझेलचा 1400 लिटरचा साठा आढळुन आला. तर बायो डिझेल सदृश्य इंधन म्हणुन विक्री केली जात असल्याची माहिती पोलीस तपासात निष्पन्न झाली. पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात 1400 लिटर बायो डिझेल तसेच पिकअप वाहन (क्र.जी.जे.01 डी.यु.5694) असा एकुण 3 लाख 12 हजाराचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.
हेही वाचा - 'ईटीव्ही भारत' विशेष - कोरोना काळात हरवलं कुपोषणाचं गांभीर्य
बायोडिझेलची अनधिकृतपणे विक्री -
बायोडिझेल विक्रीचा कुठलाही अधिकृत परवाना नसतांना बेकायदेशीर पध्दतीने साठवणुक करण्यात आली होती. पोलीस कॉन्स्टेबल मुकेश राठोड यांच्या फिर्यादीवरुन समीर हारुनभाई खिमानी, जितेश शांतीलाल खंडेलवाल, गणेश मधुकर वाडेकर (तिन्ही रा.शहादा), संजय गुलाबराव निकम (रा. सोनवद, ता.शहादा) या चौघांविरुध्द शहादा पोलिसांनी विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक दिपक बुधवंत करीत आहेत. चौघा संशयित आरोपींना शहादा प्रथम वर्ग न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने सोमवार 31 मेपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
हेही वाचा - विविध गुन्ह्यातील वाहनांना अचानक आग; पोलीस कर्मचाऱ्यांची धावपळ