नंदुरबार - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तहसीलदार, मुख्याधिकारी व पोलीस निरीक्षकांनी मौलवींसह वैद्यकीय अधिकारी व आशा सेविका यांची बैठक घेण्यात आली. यावेळी 12 सर्वेक्षण पथकांची नेमणूक करण्यात आल्याची माहिती प्रशासनातर्फे देण्यात आली.
विवाह समारंभात 50 पेक्षा जास्त तसेच अंत्ययात्रेत 20 पेक्षा अधिक व्यक्ती सहभागी होणार नाहीत, यासाठी सूचना देण्यात आल्या. तसेच जनजागृती करण्याचे आवाहन मौलवींना करण्यात आले. घरोघरी जाऊन सर्वेक्षण करण्याबाबत वैद्यकीय अधिकारी व आशा सेविकांना सुचीत करण्यात आले आहे.
जिल्ह्यातील कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावावर प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याच्या दृष्टीने नगरपालिकेच्या सभागृहात तहसीलदार, मुख्याधिकारी व पोलीस निरीक्षक यांनी मौलवींसह वैद्यकीय अधिकारी व आशावर्कर्स यांची स्वतंत्र बैठक पार पडली. यासाठी तहसीलदार भाऊसाहेब थोरात, मुख्याधिकारी डॉ. बाबुराव बिक्कड, पोलीस निरीक्षक यांच्यासह 20 ते 25 मौलवी उपस्थित होते.
सार्वजनिक ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्यासह चेहर्यावर मास्क व रुमाल लावणे बंधनकारक असून सार्वजनिक ठिकाणी थुंकू नये. विनाकारण घराबाहेर पडू नये, प्रशासनाने दिलेल्या सुचनांचे पालन करण्याबाबत जनजागृती करण्याचे आवाहन तहसिलदार भाऊसाहेब थोरात, मुख्याधिकारी डॉ.बाबुराव बिक्कड व पोलीस निरीक्षकांनी बैठकीत केले. तसेच एनयुएचएमच्या वैद्यकीय अधिकारी व आशावर्कर्सची बैठक घेण्यात आली. यावेळी शहरातील विविध भागांत घरोघरी जाऊन नागरिकांच्या आजारासंदर्भात माहिती संकलन करण्यासाठी आवश्यक सर्वेक्षणाच्या सूचना देण्यात आल्या.
कुटुंबातील सदस्यांची संख्या, 10 वर्षाखालील लहान मुले व 60 वर्षावरील वयोवृद्ध व्यक्तींची संख्या आणि त्यांना असलेल्या आजाराबाबत माहिती संकलन करण्यासंबंधी सूचना देण्यात आल्या आहेत. यासाठी 12 सर्वेक्षण पथकांची नेमणूक करण्यात आली आहे. सर्वेक्षणासाठी आलेल्या कर्मचार्यांना नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन तहसीलदारांसह मुख्याधिकार्यांनी केले आहे.