नांदेड - एका अल्पवयीन बालिकेला रात्रीच्या वेळी पळवून नेऊन तिच्यावर अत्याचार केल्याची घटना बिलोली तालुक्यातील २०१७ मध्ये घडली होती. या प्रकरणी आरोपी तरुणाला बिलोलीच्या अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाने सात वर्ष सक्तमजुरी व पाच हजार रुपये दंड अशी शिक्षा ठोठावली आहे. न्यायाधीश व्ही के मांडे यांनी बुधवारी हा निकाल दिला. सय्यद महेबुब शेख लाला (रा.वाजेगांव नांदेड) असे आरोपीचे नाव आहे.
आरोपी सय्यद महेबुब शेख लाला यातील पीडित मुलीचे कुटुंब एका विटभट्टीवर कामाला होते. नेमके त्याच ओळखीचा फायदा घेत आरोपी महेबुबने ४ सप्टेंबर २०१७ ला रामतीर्थ पोलीस ठाण्याच्या हद्दीत येऊन रात्री साडे दहाच्या सुमारास पीडित अल्पवयीन मुलीस पळवून नेले आणि अत्याचार केला. या प्रकरणी पीडित मुलीच्या वडिलांनी रामतीर्थ पोलीस स्टेशनला तक्रार दिली होती.
तक्रारीच्या अनुषंगाने पोलीस उपनिरीक्षक बनसोडे यांनी आरोपी सय्यद महेबुब शेख लाला यास अटक केली. त्याच्याविरुध्द बालकाचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण या कायद्यानुसार न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले. हा खटला जवळपास तीन वर्षे चालला. उपलब्ध साक्षी व पुराव्यांच्या आधारे न्या. मांडे यांनी हा निकाल दिला आहे. यामध्ये तक्रारदाराच्या बाजुने सरकारी वकील संदिप कुंडलवाडीकर यांनी आपली बाजु मांडली. या प्रकरणातील इतर दोन आरोपींची न्यायालयाने सुटका केली, तर या घटनेतील मुख्य आरोपी सय्यद महेबुब शेख लाला यास सात वर्षे सक्त मजुरी व पाच हजार रुपये दंडाची शिक्षा न्यायालयाने सुनावली आहे.