नांदेड - देगलूरनाका भागातील रहमतनगर येथे एका महिलेला कोरोनाची लागण झाली. त्यामुळे रहमतनगर परिसर सील करण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे.
रहमतनगर येथील ही महिला काही दिवसांपूर्वी एका खासगी रुग्णालयात दाखल झाली होती. उपचार सुरू असताना तिला श्वास घेण्याला त्रास होत होत होता. या महिलेमध्ये कोरोनाची लक्षणे दिसून आल्यानंतर तिला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात हलवण्यात आले होते. त्या ठिकाणी या महिलेची चाचणी केली असता अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
ही कोरोनाबाधित महिला डॉक्टर लेन भागातील ज्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाली होती, त्या रुग्णालयाचे निर्जंतुकीकरण केले जाणार आहे. रहमतनगरचा संपूर्ण भाग सील करण्याची तयारी प्रशासनाने सुरू केली आहे.
मागील दोन दिवसात नांदेडमध्ये २३ कोरोनाबाधित रुग्ण आढळलले आहेत. शनिवारी गुरुद्वारा हुजुर साहिब परिसरात २० जणांना कोरोना झाल्याचे समोर आले. त्यामुळे शहरात चिंतेचे वातावरण असताना आज कोरोना रुग्णाच्या संख्येत आणखी तीनने वाढ झाली. यापैकी दोन जण हे यात्रेकरूंना पंजाबला सोडून आलेल्या वाहनांचे चालक असल्याचे सांगण्यात येत आहे. नांदेडमध्ये कोरोना बाधितांची एकूण संख्या २९ असून दोन जणांचा मृत्यू झाला आहे. तर इतर २७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.