नांदेड - पत्नीच्या माहेरी लहान भावाच्या लग्नाची पत्रिका देण्यास गेलेल्या पतीने रागाच्या भरात पत्नीलाच तलाक दिला. ही धक्कादायक घटना नांदेडच्या जवाहरनगर भागात घडली. लग्नाची पत्रिका देण्यासाठी गेल्यानंतर माझ्यावर पोलीस केस का केली ? असे म्हणत पतीने पत्नीसोबत वाद घातला. यानंतर रागाच्या भरात त्याने पत्नीला तलाक दिला.
हेही वाचा... देशासाठी हौतात्म्य पत्करलेल्या मुस्लीम वीर जवानाची आई २० वर्षांपासून 'अंधारात'
या प्रकरणी पीडित पत्नीने दिलेल्या तक्रारीवरून विमानतळ पोलिसांनी पतीविरोधात गुन्हा नोंदवला आहे. कायद्याच्या दृष्टीने तीन तलाक हा अवैध आहे. मात्र, तरिही नांदेड शहरात एका व्यक्तीने त्याच्या पत्नीला त्याच पद्धतीने दिलेला तलाक सध्या चर्चेचा विषय बनला आहे. विमानतळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत पतीसोबत पटत नसल्याने एक विवाहिता तिच्या माहेरी जवाहरनगर येथे आईवडिलांसोबत राहते. तिने पतीविरोधात या अगोदरच तक्रार दिलेली आहे.
त्यामुळे त्याच्यावर पत्नीला त्रास दिल्याबद्दल गुन्हा यापुर्वीच दाखल झालेला आहे. सध्या ही विवाहिता माहेरीच राहत आहे. विवाहितेच्या पतीच्या भावाचे लग्न ठरले. त्या लग्नाची पत्रिका घेऊन विवाहितेचा पती जवाहरनगर येथे गेला. तेथे गेल्यावर त्याने पत्नीला अगोदर शिवीगाळ केली. त्यानंतर पोलीस ठाण्यात केलेली तक्रार मागे घेण्याची मागणी त्याने केली. मात्र, हे भांडण वाढत गेल्याने त्याने तिला तीन तलाक दिला.
हेही वाचा... 'कर्तबगारीने उंच झेपावलेल्या अन् अज्ञानामुळे पिचलेल्या स्त्रियांमधील अंतर व्हावे कमी'
या घटनेनंतर विवाहितेने विमानतळ पोलिसांत या प्रकरणी तक्रार दाखल केली. पोलिसांनी मुस्लिम महिला (विवाह संरक्षण) कायदा, अधिनियम २०१९ नुसार पतीविरोधात गुन्हा नोंदवला आहे.