नांदेड - राज्य शासनाने जारी केलेल्या सुधारित सूचनेनुसार नांदेड जिल्ह्यातील आठवडी बाजार, बैल बाजार, उद्याने, पार्क, मनोरंजन उद्देशासाठी खुले मैदान व औद्योगिक प्रदर्शने सुरू करण्यास जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी परवानगी दिली आहे.
हेही वाचा - गोदावरी नदीवरील विष्णुपुरी प्रकल्पाचे तीन दरवाजे उघडले....!
अनलॉक ५च्या टप्प्यात भाजी विक्रेते आणि उद्यानात जाणाऱ्यांना दिलासा मिळाला आहे. लहान मुलांना घरी राहून कंटाळा आला होता. उद्याने बंद असल्यामुळे बाहेर जाता येत नव्हते. परंतु, मास्क आणि इतर सुरक्षिततेची साधने वापरून जाण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. तरी देखील १० वर्षांखालील बालकांची घराबाहेर जाताना काळजी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. दररोजचा भाजीपाला बाजार सर्वत्र सुरू असला तरी, आठवडी बाजार मात्र बंद होता. आठवडी बाजाराच्या दिवशी भाजीपाल्याची दुकाने मोठ्या प्रमाणात येत होती. परंतु, बाजार भरविण्यास पोलिसांकडून मनाई केली जात असल्याने कमी दरात भाजीपाला विकून किंवा दूरवरच्या ठिकाणी बसून विक्री करावी लागत होती. ही गैरसोय आता काहीशी दूर झाली आहे.
हेही वाचा - ऑनलाईन शिक्षणाचा कंटाळा आलाय; लवकर शाळा सुरू करा - चिमुकलीचे मुख्यमंत्र्यांना पत्र.