नांदेड - रब्बी पिकांसाठी येत्या शुक्रवारपासून इसापूर धरणातून पाणी सोडण्यात येणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. कालवा सल्लागार समितीच्या सदस्यांसोबत सोमवारी जिल्हाधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीत पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
दरम्यान रब्बी हगांमासाठी धरणातून पहिल्यांदा पाणी सोडण्यात येत आहे. या नंतरच्या पुढील पाणी पाळ्यांचे नियोजन कालवा सल्लागार समितीशी चर्चा केल्यानंतर घेण्यात येणार आहे. प्रत्येक पाणी पाळीच्या वेळी ठरलेल्या वेळापत्रकानुसार पाणी सोडण्यात येईल, मात्र कालवा फुटणे किंवा इतर काही कारणांमुळे पाणी सोडण्यास विलंब होऊ शकतो अशी माहिती सबंधित अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे. ज्या शेतकऱ्यांनी पाणीपट्टी भरली नाही अशा शेतकऱ्यांना पाण्याचा लाभ मिळणार नाही, त्याचप्रमाणे पिकांना पाणी देण्यासाठी कोणी बेकायदेशीररित्या कालव्यात विद्युत पंप टाकल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला आहे.